सोमेश्वरनगर (बारामती) : तिरुपती बालाजी मशरूम उद्योगाच्या आर्थिक व्यवहारांची आयकर खात्याकडून अचानक तपासणी व चौकशी करण्यात आली. दोन दिवस ही तपासणी सुरू होती.
गुरुवारी तिरुपती बालाजी मशरूम उद्योगाच्या सोया व बगॅसच्या भुशाला आग लागली होती. यात पाच कोटींचे नुकसान झाले होते. अशात शुक्रवारी आयकर खात्याचे राज्याच्या व केंद्राच्या संयुक्त पथकाने अचानकपणे हजेरी लावली. कंपनीतील अधिकारी, कर्मचारी यांचे मोबाईल ताब्यात घेतल्याने संपर्क तुटला. यामुळे परिसरात उलट सुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. ईडी आहे की आयकर आहे की औद्योगिक खात्याची तपासणी आहे याबाबत तर्क वितर्क लढविले जात होते. अखेर आज सायंकाळी पथकाची तपासणी प्रक्रिया पूर्ण झाली आणि मोबाईल सुरू झाले. यानंतर आयकर खात्याचे पथक तपासणी करून गेल्याची माहिती समोर आली.
मशरूम उद्योग शेतीपूरक आहे असे व्यावसायिकांचा दावा आहे तर हा औद्योगिक प्रकल्प असल्याचा एक मतप्रवाह आहे. यावरून कर आकारणीबाबत संभ्रम आहेत. याबाबत काय व्यवहार्य मार्ग काढता येईल? आणि कर चुकवेगिरी होत आहे का? या तपासणीच्या अनुषंगाने ही तपासणी झाली असल्याचे समजते. याबाबत कंपनीचे अध्यक्ष आर. एन. शिंदे म्हणाले, आयकर खात्याने नियमित तपासणी केली. तपासणीतून हिशेब पत्रके, रेकॉर्ड चांगले असल्याचे आढळले तसेच आपल्या काही चुकाही दुरुस्त करता येतात. नव्या उद्योजकांनी यातून शिकण्यासारखे आहे. प्रत्येकाने रेकॉर्ड चांगले ठेवल्यास घाबरण्यासारखे काही नसते. सरकारी यंत्रणा ही मार्गदर्शन करण्यासाठी आणि चुका दुरुस्त करण्यासाठीच असते.