Pune Darshan Bus: पुणे दर्शनमध्ये महात्मा फुलेंचा वाडा वगळला; प्रशासनाने दिले 'हे' कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 15:30 IST2022-05-18T15:12:03+5:302022-05-18T15:30:14+5:30
पर्यटकांना पुण्यातील ऐतिहासिक ठिकाणे पाहता यावीत यासाठी पीएमपीएलने पुणे दर्शन ही बस सुरू केली आहे

Pune Darshan Bus: पुणे दर्शनमध्ये महात्मा फुलेंचा वाडा वगळला; प्रशासनाने दिले 'हे' कारण
पुणे : पीएमपीएलच्या पुणे दर्शन या बसमधून महात्मा फुले यांचा गंजपेठेतील वाडा वगळण्यात आला आहे. तिथे झालेल्या अतिक्रमणांमुळे बस आत नेता येत नाही व दूरवर उभी केली, तर प्रवासी तिथे चालत जात नाहीत, असे कारण त्यासाठी प्रशासनाकडून देण्यात येत आहे.
पर्यटकांना पुण्यातील ऐतिहासिक ठिकाणे पाहता यावीत यासाठी पीएमपीएलने पुणे दर्शन ही बस सुरू केली आहे. त्यात शहरातील २१ ठिकाणे आहेत. त्यामध्ये शनिवारवाडा, केळकर संग्रहालय अशा अनेक ठिकाणांरोबरच समता भूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या महात्मा फुले वाड्याचाही समावेश आहे.
या वाड्याभोवती मागील काही वर्षात बरीच अतिक्रमणे झाली आहेत. शहराच्या मध्यवस्तीत असल्याने तिथे मोठी बस नेते येत नाही असे कारण देत पीएमपीएल प्रशासनाने हा वाडाच पुणे दर्शनच्या बसमधून वगळून टाकला आहे. त्यामुळे कोरोना निर्बंध उठल्यानंतर पीएमपीएलनेे तिथे गाडी घेऊन जाणे बंद केले आहे. नागरिकांमधून याविषयी संताप व्यक्त करण्यात येत आहे.
आम आदमी पार्टीचे राज्य प्रवक्ते डॉ. अभिजित मोरे म्हणाले, की पीएमपीएल प्रशासन सांगते आहे ती सबब खरी असली तरी योग्य नाही. अतिक्रमण काढणे, त्याबाबत महापालिका प्रशासनाला कळवणे हे त्यांचे काम आहे. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने याची तत्काळ दखल घ्यावी व अतिक्रमणे काढून टाकावीत. आद्य समाजक्रांतीकारक असणाऱ्या या दाम्पत्याचे घर वगळणे चुकीचे आहे. योग्य ती कार्यवाही झाली नाही तर आम आदमी पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही मोरे यांनी दिला.
पुणे दर्शनची गाडी लांबीने बरीच मोठी आहे. त्या परिसरात ही गाडी जात नाही. तरीही नेलीच तर वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यामुळे गाडी त्या ठिकाणापासून दूर लावली तर मग प्रवासी तिथपर्यंत चालत जात नाहीत. अतिक्रमणे काढून रस्ता मोकळा करणे हाच त्यावरचा मार्ग आहे असे पीएमपीएलचे वाहतूक व्यवस्थापक राजेश रूपनवर यांनी सांगितले आहे.