हवेली तालुक्यात शेतसाऱ्यांवर दंड आकारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:13 IST2021-02-05T05:13:50+5:302021-02-05T05:13:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : हवेली तालुक्यातील वाढते शहरीकरण, गृहनिर्माण सोसायटी, तसेच अन्य प्रयोजनासाठी जमिनीचे बिनशेतीकरण करून उभारलेल्या ...

हवेली तालुक्यात शेतसाऱ्यांवर दंड आकारणी
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : हवेली तालुक्यातील वाढते शहरीकरण, गृहनिर्माण सोसायटी, तसेच अन्य प्रयोजनासाठी जमिनीचे बिनशेतीकरण करून उभारलेल्या इमारती, तसेच व्यावसायिक वापर यापोटी महसुली शेतसारा जमीनमालकांकडून भरला जात नव्हता. आता महसूल विभागाने महसुली साऱ्यावर दंड आकारणी करून, सारा भरण्यासाठी हजारो जमीनमालकांना नोटिसा पाठवल्या आहेत. काही सोसायट्या आणि जमीनमालकांनी सारा भरण्यास सुरुवात देखील केली आहे.
पुणे शहर आणि हवेली तालुक्यात शहरीकरण झालेल्या जमिनीवर ज्या ठिकाणी बिनशेती वापर करण्यात आला आहे. सातबारा उताऱ्यावर तशी नोंद आहे अशा जमीनमालकांना शेतसारा भरण्यासाठी नोटिसा धाडले आहेत. २००६ पासून महसूल सारावसुली झाली नव्हती. जमीनमालकांनाही महसूल शेतसारा करण्याचा विसर पडला होता. अनेक गृहनिर्माण सोसायट्यांना तर बिनशेती कर केव्हा शेतसारा असतो याची माहिती देखील नव्हती. हवेली तालुक्यातील महसूल यंत्रणेतील तलाठ्यांमार्फत शेतसाऱ्याच्या नोटिसा गेल्या महिनाभरात बजावल्या आहेत. बिनशेती किंवा व्यावसायिक वापराच्या जमिनीवरील सारा वेळेत भरला नाही, म्हणून पंचवीस टक्के दंडाची आकारणी देखील नोटीसमध्ये केली आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील धायरी, वडगाव, कात्रज, धनकवडी, नऱ्हे, आंबेगाव, उंड्री, पिसोळी, हडपसर, मुंढवा, मांजरी, वडगाव शेरी, लोहगाव खराडी, मोशी, दिघी, कळस, भोसरी, चरोली, चिखली, तळवडे, बाणेर, पाषाण, वारजे, शिवणे, कोंडवे, कोपरे यांसह हवेली तालुक्यातील गावांमध्ये बिनशेती आणि व्यावसायिक जमीन वापरावर सारा वसुली सुरू केली आहे.
--
जमिनीचा बिनशेती वापर केला असला, तरी संबंधित जमिनीला सारा भरावा लागतो महसूल कायद्यातील तरतुदीनुसार ही आकारणी बंधनकारक आहे. त्यामुळे जमीनमालकांना सारावसुलीच्या नोटिसा दिले आहेत. अनेक जमीन मालकांनी शेतसारा भरण्यास सुरुवात देखील केली असून महसूल दप्तरी असलेल्या नोंदीप्रमाणे मार्चपूर्वी डेन्सिटी आणि व्यावसायिक वापराच्या जमिनीवरील शेतसारा पूर्णपणे वसूल केला जाईल.
- सचिन बारवकर, प्रांत अधिकारी, हवेली