बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय, चुकीचे उपचार; पुण्यात बोगस डॉक्टरांच्या दुकानदारीवर कारवाईचा बडगा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 15:19 IST2022-05-09T15:18:29+5:302022-05-09T15:19:07+5:30
पुणे : बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोधमोहिमेंतर्गत महापालिकेतर्फे आतापर्यंत शहरात ४७ बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे. बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय, ...

बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय, चुकीचे उपचार; पुण्यात बोगस डॉक्टरांच्या दुकानदारीवर कारवाईचा बडगा
पुणे : बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोधमोहिमेंतर्गत महापालिकेतर्फे आतापर्यंत शहरात ४७ बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे. बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय, चुकीचे उपचार करणे अशा विविध कारणांमुळे ही कारवाई करण्यात आल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. बोगस डॉक्टर मोहीम समितीला संशयास्पद बाबी आढळून आल्यास अथवा नागरिकांकडून तक्रारी प्राप्त झाल्यास बोगस डॉक्टरांच्या दुकानदारीला आळा घालण्यासाठी बडगा उगारला जात आहे.
राज्य शासनाच्या आदेशानुसार, बोगस डॉक्टर शोधमोहीम महापालिकेतर्फे २०१२ पासून हाती घेण्यात आली आहे. महापालिका आयुक्त या समितीचे अध्यक्ष असतात, तर आरोग्य प्रमुख समितीचे सचिव असतात. याशिवाय, पोलीस प्रशासनाचा प्रतिनिधी, अन्न आणि औषध विभागाच्या प्रतिनिधी, कायदेशीर प्रतिनिधी, क्षेत्रीय स्तरावरील वैद्यकीय अधिकारी आणि सहाय्यक आरोग्य अधिकारी, सामाजिक संस्थेचा प्रतिनिधी हे समितीचे सदस्य असतात. समितीची बैठक दर दोन-तीन महिन्यांनी घेतली जाते. यामध्ये कामकाजाचा आढावा घेणे, नवीन तक्रारींविषयी चर्चा करणे, कार्यवाही करणे याबाबत बैठकीत चर्चा होते, अशी माहिती सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना बळीवंत यांनी दिली.
कायदेशीर डॉक्टरांकडे स्थानिक मेडिकल काउन्सिलमध्ये नोंद असणे आवश्यक असते. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडे डॉक्टरांच्या पदवीची नोंद गरजेची असते. इतर राज्यातून पदवी घेतली असली तरी आपण जिथे प्रॅक्टिस करतो तिथे नोंद करणे आणि दर पाच वर्षांनी नोंदीचे नूतनीकरण करणे, हा नियम आहे. क्रॉसपॅथीबद्दलच्या तक्रारी ग्राहक पंचायतीकडे कराव्या लागतात. व्यक्ती, संस्था आदींकडून तक्रार आल्यावर त्याबाबत समितीकडून शहानिशा करून कार्यवाही केली जाते. डॉक्टरांच्या नोंदणीविषयी, बेकायदेशीर उपचारांविषयी कोणतीही शंका असल्यास नागरिक महापालिकेकडे तक्रार नोंदवू शकतात.