पुणे : “पैसा नाही तर इकडे कशाला आलास?” असे म्हणत बुधवार पेठेतील वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांकडून एकाला मारहाण करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी (12 सप्टेंबर) रात्री साधारण 10 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी दत्तवाडी परिसरातील तमन्ना शाहरुख मुलाना ( वय 32), तसेच बुधवार पेठेतील तनुजा हकीमअली मौल्ला (वय 34) आणि सोनिया गुलाम शेख (वय 32) अशा तीन महिलांवर फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुण हा बुधवार पेठेत एका इमारतीत गेल्यावर तमन्ना या महिलेशी त्याचे बोलणे झाले. त्यानंतर पैशांचा ऑनलाईन व्यवहार करत असताना अँपचा पासवर्ड तरुणाला आठवला नाही. त्यामुळे रक्कम जमा झाली नाही. या कारणावरून त्या दोघांमध्ये वादाला सुरुवात झाली. तमन्ना या महिलेने शिवीगाळ केली. “पैसा नाही तर इकडे कशाला आलास?” असे म्हणत तिने संताप व्यक्त केला. त्यानंतर तिथे असणाऱ्या तनुजा आणि सोनिया दोघींनी तरुणाला धक्काबुक्की केली. तिघींनी मिळून त्याला मारहाण करत चांगलाच चोप दिला. या प्रकारानंतर जखमी तरुणाने थेट पोलिसांकडे धाव घेतली आणि तक्रार नोंदवली. पुढील तपास फरासखाना पोलिसांकडून सुरू आहे. पुणे शहरातील बुधवार पेठ परिसर कायमच विविध घटनांमुळे चर्चेत असतो. दरम्यान, या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली असून बुधवार पेठ परिसर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
याअगोदरही बुधवार पेठेत तरुणांना लुटण्याच्या घटना घडल्या आहेत. आपली हौस पूर्ण करण्यासाठी तरुण त्याठिकाणी जातात. आणि पैसे गमावून बसतात. काही जण रस्ता चुकल्याने त्याठिकाणी गेले असता त्यांनाही या महिलांनी लुटल्याची प्रकरणे समोर आली आहेत. बुधवार पेठेतील त्या गल्लीच्या पुढेच पोलीस चौकी असूनही अशा घटना वारंवार घडत असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.