मराठीची अवहेलना कराल तर याद राखा; मनसेचा बँकांना इशारा
By राजू इनामदार | Updated: January 23, 2025 17:27 IST2025-01-23T17:26:42+5:302025-01-23T17:27:13+5:30
मराठीचा अवमान खपवून घेतला जाणार नाही, केंद्र सरकारच्या अध्यादेशाचे पालन करायलाच हवे असे सांगण्यात येत होते.

मराठीची अवहेलना कराल तर याद राखा; मनसेचा बँकांना इशारा
पुणे : विधानसभेतील पराभवानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा मराठी भाषेच्या मुद्द्याला हात घातला आहे. बँक ऑफ महाराष्ट्र च्या लोकमंगल शाखेत मनसे पदाधिकाऱ्यांनी गुरूवारी दुपारी ठिय्या आंदोलन केले. बँकेच्या व्यवस्थापकांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन व पुर्ततेस ठी १५ दिवसांची मुदत व त्याबरोबरच याद राखा चा इशाराही देण्यात आला.
मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत संभूस व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते गुरूवारी सकाळीच बँकेच्या लोकमंगल या मुख्य कार्यालयासमोर जमा झाले. तेथील सुरक्षा रक्षकाने त्यांना आत सोडण्यास नकार दिला. त्यानंतर सर्वांनी मुख्य प्रवेशद्वारासमोरच बसकण मारली. तिथून उठण्यास त्यांनी नकार दिला. कार्यालयीन कामकाज सुरू झाल्याने बँकेत गर्दी व्हायला लागली. आंदोलन सुरू असल्याने सगळे काय सुरू आहे हे पाहण्यासाठी तिथेच थांबले.
बँकेचे सगळे सुरक्षा रक्षकही तिथे जमा झाले. आंदोलन थांबवण्यास त्यांनी सांगितले, मात्र त्यांना नकार देण्यात आला. दरम्यान मराठी भाषेच्या गौरवाच्या घोषणा देण्यात येत होत्या. मराठीचा अवमान खपवून घेतला जाणार नाही, केंद्र सरकारच्या अध्यादेशाचे पालन करायलाच हवे असे सांगण्यात येत होते.
आंदोलनाचा बँकेच्या कामकाजावर परिणाम होऊ लागल्याने अखेर बँकेचे जनरल मँनेजर के. राजेशकुमार यांनी आंदोलकांना चर्चा करण्यासाठी त्यांच्या कार्यालयात बोलावले. तिथे संभूस यांनी त्यांना केंद्र सरकारच्या सन २०१४ मध्ये जारी केलेल्या बँकेची भाषा प्रणाली यासंदर्भातील आदेशाची प्रत दिली. त्यानुसार राष्ट्रीयीकृत बँकांनाही त्यांचे कामकाज, खातेदारांशी संबधित कागदपत्रे, त्याचे नमुने प्रादेशिक भाषेत उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर बँक कर्माचार्यांनी खातेदारांबरोबर प्रादेशिक भाषेतच संवाद साधणे सक्तीचे आहे.
असे असतानाही बँक ऑफ महाराष्ट्र त्यांच्या कोणत्याही शाखेत मराठी भाषेचा सन्मान ठेवत नाही.खातेदारांशी संबधित कागदपत्रांचे नमुने मराठी भाषेत उपलब्ध नाहीत. याबाबत अनजक खातेदारांच्या मनसेकडे तक्रारी आल्या आहेत असे संभूस यांनी सांगितले. प्रशांत भोलागीर, केदार कोडोलीकर, संजय दिवेकर, रोहित गुर्जर, निखिल जोशी, प्रविण सोनवणे, गणेश.शिर्के, अनिल पवार अनिल कंधारे, अशोक गवाधे, अभय धोत्रे, गणेश राठोड, राहुल वानखडे यावेळी उपस्थित होते.
येत्या १५ दिवसात बँकेने सर्व खातेदारांशी संबधित सर्व आवश्यक नमुना कागदपत्रांच्या प्रति मराठी भाषेत उपलब्ध करून द्याव्यात, कर्मचार्यांनी बँकेत आलेल्या ग्राहकांबरोबर मराठीतच संवाद साधावा. याची दखल घेतली गेली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. के. राजेशकुमार यांनी मागण्यांची पुर्तता करण्याचे आश्वासन दिले असल्याचे संभूस यांनी सांगितले. बँक ऑफ महाराष्ट्र बरोबरच बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, युनियन बँक, आय.सी.आय.सी.बँक, अँक्सीस बँक, कोटक महिंद्रा यांनाही असेच निवेदन मनसेच्या वतीने दिले असल्याची माहिती संभूस यांनी दिली.