निवडणुकांची भीती वाटत असेल तर तुमचे १०० नगरसेवक एकदा कोण ते ठरवा; वसंत मोरेंचा भाजपवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 16:18 IST2025-09-18T16:17:33+5:302025-09-18T16:18:11+5:30

१०० नगरसेवक एकदा कोण कोण ते ठरवा आणि त्यांची नावे जाहीर करून टाका. आणि कृपा करून "उरलेल्या ६५ जागांवर तरी निवडणुका घ्या राव..."

If you are afraid of elections, decide who your 100 corporators are; Vasant More targets BJP | निवडणुकांची भीती वाटत असेल तर तुमचे १०० नगरसेवक एकदा कोण ते ठरवा; वसंत मोरेंचा भाजपवर निशाणा

निवडणुकांची भीती वाटत असेल तर तुमचे १०० नगरसेवक एकदा कोण ते ठरवा; वसंत मोरेंचा भाजपवर निशाणा

पुणे:  पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर होऊन त्यावर हरकती सूचनांची सुनावणी झाली आहे. त्यामुळे सर्व पक्षांतील इच्छुक तयारीला लागले आहेत. आता पासूनच स्वतःची व्होट बँक तयार करण्यासाठी आणि मतदारांना आर्कषित करण्यासाठी नवरात्र उत्सव डोळ्यासमोर ठेवून अनेक इच्छुकांनी आता कोल्हापुरच्या महालक्ष्मीदेवी सहविविध ठिकाणी देवदर्शन सहलीचे आयोजन केले आहे. यावरून आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते वसंत मोरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. उरलेल्या ६५ जागांवर तरी निवडणुका घ्या राव...'' असं म्हणत त्यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. 

मोरे म्हणाले,  भाजपा म्हणते पुण्यात आमचे १०० नगरसेवक निवडून येणार. मग माझं पुणे भाजपाला एक सांगणं आहे की, तुम्हाला जर निवडणुकांची भीती वाटत असेल तर तुम्ही तुमचे १०० नगरसेवक एकदा कोण कोण ते ठरवा आणि त्यांची नावे जाहीर करून टाका. आणि कृपा करून "उरलेल्या ६५ जागांवर तरी निवडणुका घ्या राव..." लय कटाळा आलाय आणि ते इच्छुक तर पार पार बेजार झालेत खर्च करून करून..!

वसंत मोरे यांनी मनसे सोडल्यानंतर खासदारकीच्या पराभवाचा त्यांना सामना करावा लागला. त्यानंतर त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. विधानसभेच्या निवडणुकीत वसंत मोरे यांनी आमदारकी लढणार नसल्याचे सांगितले होते. परंतु महानगरपालिका लढवणार असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले होते. आता ते सध्या महापालिका निवडणुकीची तयारी करत आहेत. अशातच त्यांनी भाजपवर निशाणा साधत ही पोस्ट केली आहे.

पुणे महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना २२ ऑगस्ट रोजी जाहीर झाली. त्यानंतर प्रभाग रचनेवर ५ हजार ९२२ हरकती आणि सूचना आल्या होत्या. त्यावर सुनावणी झालेली असुन त्याबाबतच अहवाल नगरविकास विभागाला सादर करण्यात आला आहे. येत्या ३ते ६ ऑक्टाेंबर या कालावधीत अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागातील सर्वपक्षीय इच्छुक आता तयारीला लागले आहेत. काही इच्छुकांचे प्रभाग तोडण्यात आले आहेत. त्यामुळे नवीन भागामध्ये इच्छुकांनी बस्तान बसविण्यास सुरवात केली आहे. त्यासाठी विविध उपक्रमाचे आयोजन केले जात आहे. या सर्व माध्यामातुन इच्छुक व्होट बॅकचे आखाडे बांधत आहेत. कोल्हापुरच्या महालक्ष्मीदेवी , उज्जैनची यात्रा यासह विविध ठिकाणी देवदर्शन सहलीचे आयोजन केले आहे. त्यासाठी बस गाड्या, रेल्वेची सोय करण्यात आली आहे . आधार कार्ड केंद्र, विविध शासकीय दाखले मोफत देण्यासह अनेक फंडे व्होट बँक तयार करण्यासाठी इच्छुकांकडुन वापरले जात आहेत.

Web Title: If you are afraid of elections, decide who your 100 corporators are; Vasant More targets BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.