सासवड : पुण्याचे विमानतळ येथून ३६ किलोमीटर असताना येथे विमानतळाची काय आवश्यकता. विमानतळाची आवश्यकताच असेल तर बारामती येथे विमानतळ असून त्याचे विस्तारीकरण करण्यात यावे. कारण बारामतीकरांना मोदी-शहांना रात्री अपरात्री भेटावयास जावे लागते, अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
पुरंदरला विमानतळाची आवश्यकता नसून विनाकारण शेतकऱ्यांच्या सुपीक आणि पिकाऊ जमिनी बळकावून हे विमानतळ करू नये. शासनाने हा निर्णय रद्द करावा, ज्यांनी लोढा, अग्रवाल, यांना जमीन दिल्याने मंत्रालयात बसून विमानतळाचे काम सुरू आहे. जमीन खरेदी करणारी टोळी असून पैसे घेऊन जमिनी खरेदी करायची आणि मंत्रालयात बसून प्रकल्प आणायचे. तुम्हाला फार हौस असेल तर बारामतीचा विमानतळ विस्तारित करा आणि त्याचा वापर करा, अशी भूमिका यावेळी विमानतळबाधित शेतकऱ्यांसमोर बोलताना मांडली.
पुरंदर विमानतळ प्रकल्प बाधित कुंभारवळण गावच्या अंजना कामथे यांचे विमानतळाच्या धक्क्याने शनिवारी निधन झाले. त्यानंतर पोलिस आणि शेतकरी यांच्यात मोठ्या प्रमाणात धूमश्चक्री झाली. पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्यात अनेक शेतकरी जखमी झाले, तर अनेक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. या घटनेचे संपूर्ण राज्यात पडसाद उमटले. सरकारला विमानतळ जागेचा सर्व्हे स्थगित करावा लागला. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कुंभारवळण येथे त्यांच्या घरी जाऊन कामथे कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यानंतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सरकारवर तुफान हल्लाबोल केला.