Cyber Crime: 'मी मुंबईचा सायबर डीसीपी बोलतोय' सांगून ९८ हजारांना गंडा
By भाग्यश्री गिलडा | Updated: June 21, 2023 17:32 IST2023-06-21T17:32:47+5:302023-06-21T17:32:54+5:30
तुमचे कुरियर आले असे सांगून फसवणूक करणाऱ्यांची टोळी सक्रिय झाल्याने त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, पोलिसांचे आवाहन

Cyber Crime: 'मी मुंबईचा सायबर डीसीपी बोलतोय' सांगून ९८ हजारांना गंडा
पुणे : मुंबईचे सायबर डीसीपी हेमराजसिंग राजपुत आणि अजय कुमार बन्सल यांची नावे वापरून फसवणूक केल्याचा प्रकार बाणेर परिसरात घडला आहे. तुमचे आयडी वापरून परदेशातून तुमच्या नावे कुरियर आले आहे ते जर तुमचे नसेल तर तक्रार दाखल करावी लागेल असे सांगून ९८ हजार ७२६ रूपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.
बाणेर परिसरात राहणाऱ्या एका ४२ वर्षीय महिलेने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, महिलेला अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन आला. मुंबईचा सायबर डीसीपी बोलत आहे असे सांगून सायबर चोरटे तुमच्या आयडीचा वापर करत आहेत. तुमच्या नावे परदेशातून कुरियर आले आहे. कुरियर तुम्ही मागवले नसेल किंवा तुमचे नसेल तर तात्काळ सायबर पोलिसांना तक्रार करा असे सांगितले. सायबर क्राईम अंधेरी अशा नावाचा स्काईप आयडी वापरून वेगवेगळी करणे देत महिलेच्या मोबाईलचा ताबा मिळवला. त्यांनतर एकूण ९८ हजार ७२६ रुपये परस्पर पैसे ट्रान्स्फर करून घेतले. मात्र संशय आल्याने महिलेने तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरुद्ध चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक चिंतामण अंकुश हे करत आहेत.
''तुमचे कुरियर आले असे सांगून फसवणूक करणाऱ्यांची टोळी सक्रिय आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. कोणत्याही शहराचे पोलीस आयुक्त/ उपायुक्त असे फोन करत नाही. त्यामुळे अशी नावे घेतली तर घाबरून न जाता खासगी माहिती देण्याआधी शहानिशा करणे महत्वाचे आहे. असा फोन आल्यास तात्काळ पोलिसांना कळविले पाहिजे. - चिंतामण अंकुश, पोलीस निरीक्षक, चतुःशृंगी पोलीस ठाणे''