Pune: पत्नीला सांभाळण्याची जबाबदारी पतीची, दरमहा पोटगी देण्याचे आदेश

By नम्रता फडणीस | Published: November 17, 2023 04:23 PM2023-11-17T16:23:10+5:302023-11-17T16:25:25+5:30

अंतरिम पोटगीचा अर्ज फेटाळण्याची त्याने मागणी केली...

Husband's responsibility to maintain wife, ordered to pay monthly alimony | Pune: पत्नीला सांभाळण्याची जबाबदारी पतीची, दरमहा पोटगी देण्याचे आदेश

Pune: पत्नीला सांभाळण्याची जबाबदारी पतीची, दरमहा पोटगी देण्याचे आदेश

पुणे : पत्नीचे आई वडील जरी कमवत असतील तरी पत्नीला सांभाळण्याची जबाबदारी ही पतीची असते. तिचे माहेर चांगले म्हणून जबाबदारी टाळता येत नाही असे निरीक्षण नोंदवित प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जे. एम चौहान यांनी पत्नीला दरमहा १२ हजार रुपये अंतरिम पोटगी देण्याचा पतीला आदेश दिला.

राकेश आणि सीमा (नाव बदललेले आहे) यांचे लग्न झाले. पण तिला पतीसह त्याच्या कुटुंबियांकडून चांगली वागणूक मिळत नव्हती. त्यामुळे ती माहेरी राहू लागली. तिने कुटुंबियांविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराअंतर्गत केस दाखल करून अंतरिम पोटगीसाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. अॅड नीता भवर यांनी न्यायालयात तिची बाजू मांडली. नंणदने तिला घरातून बाहेर काढले आणि तिला नांदू दिले नाही. त्यामुळे तिला माहेरी राहावे लागले. ती सासरी असतानाही तिला आई वडील पैसे पुरवित असायचे. लग्नाच्या वेळी पती एका खासगी कंपनीत नोकरीला होता. त्याला ४० हजार रुपयांच्या पगाराची नोकरी होती. चिखलीला एक फ्लॅट आणि नारायण पेठेत असलेली प्रॉपर्टी सासरकडच्यांनी पुर्नविकासासाठी दिली आहे.

डिझाईनच्या कामासाठी तो व्हिजिटिंग चार्जेस देखील घेतो. सीमाला योगा शिक्षिका म्हणून एका शाळेत नोकरी लागली होती. पण घराच्या त्रासामुळे तिला नोकरी सोडावी लागली असा युक्तिवाद ऍड भवर यांनी केला. मात्र पतीने या सर्व गोष्टी मान्य करण्यास नकार दिला. राकेश याने पत्नी ही माहेरच्यांच्या प्रभावाखाली कायम असते. लग्नाच्या वेळी मी ज्या कंपनीत काम करीत होतो. ती नोकरी घरच्या ताणतणावामुळे सोडावी लागली. आता दुसऱ्या कंपनीत काम करीत असलो तरी  पण तिथे पगार फक्त २६ हजार ८०० इतका आहे.

माझ्यावर आई-वडिलांची जबाबदारी आहे. घराचे कर्ज आहे. पत्नी चांगली शिकलेली आहे. ती योगा शिक्षिका म्हणून काम करू शकते. त्यामुळे अंतरिम पोटगीचा अर्ज फेटाळण्याची त्याने मागणी केली. न्यायालयाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतले. त्यावर न्यायालयाने अर्जदाराचे पालक जरी कमवत असले तरी पत्नीची जबाबदारी पतीची असते . तिचे माहेर चांगले म्हणून जबाबदारी टाळता येत नाही असे सांगत न्यायालयाने पत्नीला  दरमहा १२ हजार रुपये अंतरिम पोटगी देण्याचा आदेश दिला.

Web Title: Husband's responsibility to maintain wife, ordered to pay monthly alimony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.