माणुसकी संपली! हेल्थ चेकअपमध्ये कॅन्सर झाल्याचे कळले; IT कंपनीने २१ वर्षांचा अनुभव असलेल्या कर्मचाऱ्याला काढले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 14:18 IST2025-12-10T14:17:07+5:302025-12-10T14:18:44+5:30
Pune IT Company Firing Cancer: संतोष पाटोळे नावाचे हे कर्मचारी गेल्या आठ वर्षांपासून SLB कंपनीत 'फॅसिलिटी मॅनेजर' म्हणून कार्यरत होते. त्यांना एकूण २१ वर्षांचा अनुभव आहे. लिंक्डइन पोस्टवर त्यांनी हा विषय मांडला आहे.

माणुसकी संपली! हेल्थ चेकअपमध्ये कॅन्सर झाल्याचे कळले; IT कंपनीने २१ वर्षांचा अनुभव असलेल्या कर्मचाऱ्याला काढले
पुण्यातील आयटी क्षेत्रातील नैतिक जबाबदारी आणि कर्मचारी सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. येरवडा येथील कॉमर्स झोनमध्ये असलेल्या 'एसएलबी' नावाच्या एका बहुराष्ट्रीय आयटी कंपनीने, त्यांनीच आयोजित केलेल्या हेल्थ चेकअप कॅम्पमध्ये कर्करोगाचे निदान झालेल्या आपल्या एका अनुभवी कर्मचाऱ्याला अचानक कामावरून काढून टाकले आहे. यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या त्या कर्मचाऱ्याने आता न्याय मिळवण्यासाठी कंपनीच्या पुणे कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली आहे.
संतोष पाटोळे नावाचे हे कर्मचारी गेल्या आठ वर्षांपासून SLB कंपनीत 'फॅसिलिटी मॅनेजर' म्हणून कार्यरत होते. त्यांना एकूण २१ वर्षांचा अनुभव आहे. लिंक्डइन पोस्टवर त्यांनी हा विषय मांडला आहे.
याच वर्षी एप्रिलमध्ये कंपनीने आयोजित केलेल्या वार्षिक आरोग्य तपासणीत पाटोळे यांना थायरॉईड नोड्यूल इस्थमस कॅन्सर असल्याचे निदान झाले. त्यांनी मे आणि जून महिन्यात शस्त्रक्रिया आणि उपचारासाठी वैद्यकीय रजा घेतली. कंपनीच त्यांचा वैद्यकीय खर्च करत होती. उपचारातून थोडे बरे झाल्यावर १ जुलै रोजी डॉक्टरांकडून 'फिटनेस प्रमाणपत्र' घेऊन ते कामावर परतण्याच्या तयारीत असतानाच, २३ जुलै रोजी कंपनीने त्यांना अचानक कामावरून काढल्याचे पत्र दिले.
काय कारण दिले...?
पाटोळे यांचा आरोप आहे की, कंपनीने त्यांच्यावर एका प्रोजेक्टमध्ये २.५ ते ३ कोटी रुपयांचे नुकसान केल्याचे खोटे कारण देत त्यांना कामावरून काढले. प्रत्यक्षात तो प्रोजेक्ट अजून कार्यान्वित झालाच नव्हता.
उपोषणाचा पवित्रा
नोकरी गेल्यामुळे पाटोळे यांच्यावर पुढील महागड्या उपचारांचा खर्च करण्याची मोठी आर्थिक व मानसिक जबाबदारी पडली आहे. कंपनीने त्यांचा वैद्यकीय खर्च देणे बंद केले आहे. या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आणि न्याय मागण्यासाठी त्यांनी कंपनीच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. माध्यमांनी SLB कंपनीच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकली नाही. या गंभीर प्रकरणाकडे आता श्रम विभाग आणि मानवाधिकार संघटनांचे लक्ष वेधले गेले आहे.