वाघोलीतील मानवी सांगाड्याची ओळख पटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:17 IST2020-12-05T04:17:08+5:302020-12-05T04:17:08+5:30
पुणे नगर महामार्गावरील हॉटेलच्या पाठीमागे असणाऱ्या ओढ्यामध्ये दुचाकी व मानवी कवटी, हाडे पडली असल्याची माहिती मिळाली होती. दुचाकी ...

वाघोलीतील मानवी सांगाड्याची ओळख पटली
पुणे नगर महामार्गावरील हॉटेलच्या पाठीमागे असणाऱ्या ओढ्यामध्ये दुचाकी व मानवी कवटी, हाडे पडली असल्याची माहिती मिळाली होती. दुचाकी नंबरच्या आधारे गुन्हे शोध पथकाचे बाळासाहेब सकाटे व ऋषिकेश व्यवहारे यांनी मालकाची माहिती घेतली. दुचाकी सुखसागर नगर येथील महेश दारवटकर यांच्या नावावर असल्याचे समजले. दारवटकर यांच्या घरी पोलीस पोहचले असता त्यांनी दुचाकी आकुर्डी येथे विकल्याचे सांगितले. त्यानंतर आकुर्डी येथील विशाल जाधव यांच्याकडे चौकशी केली असता दुचाकी वाघोली येथील अजय इंदू अंधारे हा तरुण वापरत असल्याचे समजले. १४ ऑक्टोबर रोजी झालेल्या मुसळधार पावसाच्या दरम्यान रात्री १० वा. अजयने मित्रांना पाऊस खूप असल्याचे फोनवर सांगितले होते. त्यानंतर त्याचा फोन आला नाही किंवा संपर्क झाला नाही. मिळालेल्या माहितीच्या आधारे हाडांचा सांगाडा अजय अंधारे याचा असल्याची खात्री झाली. अर्धवट सापळा व कवटीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर अंधारे याच्या मृत्यूबाबत शिक्कामोर्तब झाले.