पुणे: जिल्ह्यातील बिबट प्रवण क्षेत्र असलेल्या शिरूर व आंबेगाव तालुक्यांत गेल्या महिनाभरात आतापर्यंत १७ बिबटे पकडण्यात आले असून, हे सर्व बिबटे जुन्नर येथील माणिकडोह बिबट निवारण केंद्रात ठेवण्यात आले आहेत. बिबट्यांच्या हल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
जिल्ह्यातील मानव-बिबट संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत असून, या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी मंगळवारी (दि. ११) डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात सविस्तर बैठक घेण्यात आली. जुन्नर विभागाचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, पुणे विभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते, प्रादेशिक व वन्यजीव विभागाचे सहायक वनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी तसेच अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान अतिसंवेदनशील गांवामध्ये एआय प्रणाली, सोलार नाईट सर्व्हिलन्स ड्रोन, कॅमेरा ट्रॅप्स, साउंड अलर्ट सिस्टीम ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. सद्य:स्थितीत जुन्नर वनविभागाकडे २६२ पिंजरे उपलब्ध आहेत व उर्वरित पिंजरे तयार करण्याचे काम सुरू आहे. तसेच इतर आवश्यक साहित्य खरेदीची कार्यवाही सुरू असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले. बिबट्यांच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून तो २४ बाय ७ कार्यरत आहे. या नियंत्रण कक्षाचा टोल-फ्री क्रमांक १८००३०३३ असा आहे.
डुडी म्हणाले, ‘बाहेरील जिल्हे, राज्यांमधून अल्पावधीत ७०० पिंजरे उपलब्ध करून देऊ शकणाऱ्या पुरवठादार एजन्सी किंवा कंपन्यांकडून खरेदी करण्यात यावी. तसेच संभाव्य बिबट प्रवण क्षेत्र घोषित केलेल्या गावांमध्ये आवश्यक त्या ठिकाणी तत्काळ पिंजरे उपलब्ध करून द्यावेत. ग्रामस्तरावर ग्रामसभा घेऊन नागरिकांना सध्या सुरू असलेल्या उपाययोजना, जिल्ह्यातील घटना व त्यावर केलेल्या कार्यवाहीबाबत सविस्तर माहिती द्यावी. याचबरोबर ग्रामस्तरावर सहनियंत्रण समिती गठित करून त्यामध्ये अनुभवी व्यक्ती, वन आपदा मित्र, स्वयंसेवी संस्था व स्वयंसेवकांचा समावेश करावा.’
या समितीमार्फत ड्रोन सर्वेक्षण करून गावात आढळणाऱ्या बिबट्यांची संख्या नोंदविणे, गस्त वाढविणे व नागरिकांना जनजागृती करणे, तसेच बिबट हल्ल्याच्या अनुषंगाने आदर्श कार्यपद्धती निश्चित करावी, असेही आदेश त्यांनी यावेळी दिले. याशिवाय पोलिस अधीक्षक यांच्या स्तरावर ‘टायगर सेल’ची बैठक घेऊन समन्वय वाढविण्याचे सांगितले. सद्य:स्थितीत माणिकडोह बिबट निवारण केंद्रात ५० बिबटे ठेवण्याची क्षमता असून, सध्या ६७ बिबटे तिथे आहेत. जिल्ह्यात बिबट्यांच्या संख्येत वाढ होत असल्याने, जुन्नर वनविभागात १ हजार बिबटे आणि पुणे वनविभागात ५०० बिबटे सामावतील अशा विविध ठिकाणी नवीन बिबट निवारा केंद्रे उभारण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश डुडी यांनी संबंधित विभागांना दिले.
Web Summary : Human-leopard conflict intensifies in Pune district. Seventeen leopards captured in Shirur and Ambegaon are now at Manikdoh center. Control room established with toll-free number 18003033. Plans underway for new leopard centers.
Web Summary : पुणे जिले में मानव-तेंदुआ संघर्ष तीव्र हुआ। शिरूर और आंबेगांव में सत्रह तेंदुए पकड़े गए, माणिकडोह केंद्र में स्थानांतरित। नियंत्रण कक्ष स्थापित, टोल-फ्री नंबर 18003033। नए तेंदुआ केंद्रों की योजनाएँ जारी।