पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 17:52 IST2025-09-10T17:50:41+5:302025-09-10T17:52:22+5:30
IT Return Scam In Pune: एका पेशाने आयकर भरणाऱ्या एका मोठ्या टोळीने हा घोटाळा केला आहे. या टोळीने नोकरदारांना त्यांच्या उत्पन्नावर कर परतावा मिळवून देण्याच्या आमिषाने हजारो लोकांचे आयकर भरले आणि त्यांना ते परत मिळवूनही दिले आहेत.

पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले...
पुण्यामध्ये भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा उघडकीस आला आहे. आता आयकर विभाग आयटी इंजिनिअर, ऑटोमोबाईल किंवा अन्य खासगी, मल्टीनॅशनल कंपन्यांच्या या हजारो कर्मचाऱ्यांना शोधत आहे. सुमारे ५०० कोटी रुपयांचा हा टॅक्स रिफंडचा घोटाळा असून पुण्यातील बहुतांश खासगी कंपन्यांचे कर्मचारी यात गोत्यात आले आहेत.
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचं काम करणाऱ्यांच्या एका मोठ्या टोळीने हा घोटाळा केला आहे. या टोळीने नोकरदारांना त्यांच्या उत्पन्नावर कर परतावा मिळवून देण्याच्या आमिषाने हजारो लोकांचे आयकर भरले आणि त्यांना ते परत मिळवूनही दिले आहेत.
या टोळीने पुण्यात पाच वर्षांहून अधिक काळ हा घोटाळा केला आहे. तसेच १० हजारांहून अधिक आयकर रिटर्न भरले आहेत. या टोळीने अधिकतर खासगी आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या पगारदार लोकांना हे करून दिले आहे. यामुळे या टोळीबरोबर खोट्या पावत्या, एचआरए आदी दाखवून आयकर रिटर्न भरणाऱ्या या नोकरदारांवरही कारवाई होणार आहे.
गृहकर्जाचे व्याज आणि मुद्दल परतफेड, वैद्यकीय खर्च, विमा प्रीमियम, शैक्षणिक कर्ज आणि एचआरए यासारखे दावे वाढवून करण्यात आले आहेत. या दाव्यांसाठी कोणतेही कागदपत्रे देण्यात आली नाहीत, असे आयकर विभागाचे म्हणणे आहे. आयकर विभागानुसार हे एक संघटित रॅकेट होते. जुन्या फाइलिंग सिस्टममधील त्रुटींचा फायदा घेत हे करण्यात आले होते. आता कोणालाही सोडले जाणार नाही. नवीन फायलिंग सिस्टीममध्ये या त्रूटी दूर केल्या गेल्या आहेत.