आगामी निवडणुकांसाठी प्रभागरचना कशी राहणार ? उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2021 21:45 IST2021-09-03T21:44:56+5:302021-09-03T21:45:15+5:30
राज्य सरकारमधील तीन घटक पक्ष मिळून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन प्रभाग रचनेबाबत योग्य तो निर्णय घेतील.’’

आगामी निवडणुकांसाठी प्रभागरचना कशी राहणार ? उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं विधान
पिंपरी : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्या परिने प्रभागाची रचना करायला सांगितली आहे. पण, प्रभाग एकचा, दोनचा, तीनचा की चारचा करायचा याचा सर्वस्वी अधिकार राज्य सरकारचा आहे. राज्य सरकारने प्रभाग रचनेबाबत अंतिम निर्णय घेतलेला नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
पवार म्हणाले, ‘‘ राज्य सरकार त्याबाबतचा निर्णय केव्हाही मंत्रीमंडळात घेऊ शकते. आज एकसदस्यीय नगरसेवक पद्धतीने वॉर्ड रचना होत आहे. उद्या जे ठरेल त्यामध्ये दोनचे ठरले तर, एक आणि दोन वॉर्ड जवळ येतील. राज्य सरकारमधील तीन घटक पक्ष मिळून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन योग्य तो निर्णय घेतील.’’
इंधन दरवाढीबाबत केंद्रावर टीका
दहा महिन्यापासून राजधानी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. मात्र, मोदी सरकारकडून याची कोणतीही दखल घेतली जात नाही. हे जनतेचं दुर्दैव आहे. अशी टीका करतानाच इंधन दरवाढीवरुन अजित पवार यांनी मोदी सरकारला खडे बोल सुनावले. कोरोनामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना इंधन दरवाढीचा फटका बसत आहे. ते नियंत्रित करण्यासाठी केंद्राकडून कोणतीही उपाययोजना केली जात नाही, असी टीका अजित पवार यांनी केली.
पिंपरी चिंचवड महापालिकेतील लाच प्रकरणावर अजित पवार म्हणाले...
अजित पवार म्हणाले, ‘‘राजीनामा घ्यावा की नाही हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे. परंतु, आपल्या पिंपरी-चिंचवडच्या इतिहासात अशा पद्धतीची घटना कधी घडली नव्हती. महापालिकेत भाजपची सत्ता असताना अशी प्रकारची घटना घडली. हे शहरातील सर्व नागरिक उघड्या डोळ्याने बघत आहेत. मी १९९१ पासून २०१७ पर्यंत २० वर्षे या शहराचे नेतृत्व केले. परंतु, अशा पद्धतीने कोणत्याही गोष्टी होऊ दिल्या नाहीत. जर यदा कदाचित छोटी-मोठी घटना झाली. तर, तिथल्या तिथे संबंधितांवर कडक अॅक्शन घेण्यासाठी मी मागेपुढे बघितले नाही.’’