पुणे: बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पकडलेले सगळे आरोपी पुण्यातच कसे सापडले? असा प्रश्न करत बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी या हत्या प्रकरणाचे पुणे कनेक्शन असल्याचा आरोप केला. पोलिस तपासात हे सगळे बाहेर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तोपर्यंत बीडमध्ये सामाजिक सलोखा राखावा असे आवाहनही त्यांनी बीडमधील जनतेला केले.
पुण्यात काही कामासाठी म्हणून खासदार सोनवणे आले होते. पत्रकारांबरोबर बोलताना त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावर भाष्य केले. या हत्येत पकडलेल्या आरोपांना पोलिसांनी मोक्का लावला. तशी जनतेचीच मागणी होती. मोक्का लावला म्हणून कोणी बीडमध्ये मोर्चा काढत असतील तर ते अयोग्य आहे. तिथे जमावबंदी आहे. त्यामुळे ती मोडली जात असेल तर पोलिसांनी त्याची दखल घ्यावी.
पोलिस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. २९ नोव्हेंबरपासूनचा घटनाक्रम तपासला जात आहे. खंडणी कोणी मागितली? मध्यस्थी कोणी केली? किडनॅपिंग कोणी केले? सगळे आरोपी पुण्यातच कसे सापडले? हे सर्व आता तपासात पुढे येईल. बीडचे जिल्हा पोलिस अधीक्षक यावर लक्ष ठेवून आहेत. हा एकच गुन्हा नाही, असे अनेक गुन्हे आता बाहेर येतील. आमची मागणी गुन्हेगारांना शिक्षा व्हावी अशी आहे. ती होईपर्यंत आम्हीही यावर लक्ष ठेवून आहोत, असे सोनवणेही म्हणाले.
महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी विरोधी कायदा (मोक्का) लावावा अशी बीडमधील जनतेची मागणी होती. पोलिसांना तपासात तसे काही सापडले असेल, त्यामुळे त्यांनी मोक्का लावला असे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी सांगितले. मोक्का लावला म्हणून जमावबंदी आदेश मोडून कोणी मोर्चा काढत असेल तर पोलिस त्यांच्यावरही कारवाई करतील, असेही ते म्हणाले.