आणखी किती बळी घेणार?
By Admin | Updated: December 19, 2014 23:56 IST2014-12-19T23:56:25+5:302014-12-19T23:56:25+5:30
कुठेही धोक्याची सूचना देणारे फलक नाहीत; जे आहेत, ते वाचता येत नाहीत; सेवा रस्त्यावरून महामार्गावर येण्यासाठी असलेल्या जागा,

आणखी किती बळी घेणार?
लक्ष्मण मोरे, पुणे
पुणे : कुठेही धोक्याची सूचना देणारे फलक नाहीत; जे आहेत, ते वाचता येत नाहीत; सेवा रस्त्यावरून महामार्गावर येण्यासाठी असलेल्या जागा, दुभाजक तोडून तयार केलेले ‘पंक्चर’ अशी अवस्था आहे कात्रज बोगदा ते नऱ्हे पुलादरम्यानची. मानवी चुका, महामार्ग प्राधिकरणाचे अक्षम्य दुर्लक्ष आणि चुकीचे ‘इन्फ्रास्ट्रक्चर’ याची शिक्षा निरपराधांना आपले प्राण गमावून मोजावी लागत आहे.
शुक्रवारी सकाळी दरीपुलाजवळ झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा बळी गेला. रस्त्याची चुकीची आखणी, वाहतुकीचे नसलेले नियोजन आणि बेशिस्त वाहनचालक ही येथील अपघातांची प्रमुख कारणे आहेत. दुरदृष्टीच्या अभावामुळे आणि ठेकेदारांशी असलेले लागेबांधे जपण्यासाठी महामार्ग प्राधिकरण नागरिकांच्या जिवाशी खेळत आहे. वाहतूक पोलिसांनी अपघातप्रवण क्षेत्र आणि रस्त्यामधील दुरुस्त्यांसंदर्भात अहवाल देऊनही त्यावर कोणतीच कार्यवाही केली जात नसल्याचे
वास्तव आहे.
कात्रज बोगदा, नऱ्हे पूल आणि दरीपूल हा भाग मुंबई-बंगळुरु महामार्गावरील अपघातांमध्ये सर्वाधिक धोकादायक ठरत आहे. ‘लोकमत’ने शुुक्रवारी या अपघातप्रवण ठिकाणांची पाहणी केली. काही ठिकाणी मानवी चुकांमुळे, तर काही ठिकाणी बांधकामातील चुकांमुळे अपघाती क्षेत्र तयार झाले आहे. तीन वर्षांपासून सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरण आणि पुलाच्या कामांमध्ये फारशी प्रगती झालेली नसल्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. (प्रतिनिधी)