पुणे: शुक्रवार पेठ येथील महेश पाठक (वय ५३) यांचा मृतदेह ताब्यात देण्यास पूना हॉस्पिटल प्रशासनाने ८ तासांचा विलंब केल्याची तक्रार नातेवाईक नीलेश महाजन यांनी आरोग्य अधिकाऱ्यांकडे केली होती. त्याची गंभीर दखल घेत महानगरपालिकेच्या आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी पूना हॉस्पिटल प्रशासनाला २४ तासांत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी रुग्णाचे नातेवाईक नीलेश महाजन यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे २५ एप्रिलला लेखी तक्रार केली होती. या तक्रारीची चौकशी आरोग्य विभागाने केली. त्यानंतर आरोग्य विभागाने पूना हॉस्पिटलला नोटीस बजावली आहे. या नोटिशीत रुग्णालयाने कर्तव्यात कसूर केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
शहरी गरीब योजनेअंतर्गत पूना हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या महेश पाठक यांचा २५ एप्रिलला रात्री १.३० वाजता मृत्यू झाला. या वेळी रुग्णाबाबत दुजाभाव करत मृतदेह आठ तासांनी ताब्यात दिल्याची नातेवाइकांची तक्रार प्राप्त होताच झाल्या प्रकरणाची दखल घेत आरोग्य विभागाने चौकशी संदर्भात तत्काळ पावले उचलली आहेत. आरोग्य प्रमुखांनी पूना हॉस्पिटलला पाठविलेल्या पत्रात रुग्णालय प्रशासनाने महाराष्ट्र शासन अधिसूचनेमधील नियम ११ (एल) चे पालन करण्यात कसूर केली असल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास आल्याचे म्हटले आहे. ही गंभीर बाब असून बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲक्ट १९४९ व महाराष्ट्र शासन अधिसूचनेतील तरतुदीचे उल्लंघन करणारी कृती असल्याचे म्हटले आहे. या संदर्भात नोटीस प्राप्त होताच २४ तासांच्या आत संबंधित डॉक्टरांचे खुलासा पत्र व वस्तुस्थितीदर्शक अहवाल आरोग्य अधिकाऱ्यांना सादर करण्याचे आदेश पूना हॉस्पिटल प्रशासनाला दिले आहेत.