निरलस कार्यकर्ते निर्माण व्हावेत : सदानंद मोरे; आदर्श माता-पित्यांचा पुण्यात सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 12:54 IST2018-01-17T12:48:22+5:302018-01-17T12:54:24+5:30
समाजामध्ये निरलस कार्यकर्ते निर्माण होणे आवश्यक असून मातृपितृॠण समाजाने फेडणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ. सदानंद मोरे यांनी केले.

निरलस कार्यकर्ते निर्माण व्हावेत : सदानंद मोरे; आदर्श माता-पित्यांचा पुण्यात सत्कार
पुणे : समाजामध्ये निरलस कार्यकर्ते निर्माण होणे आवश्यक असून मातृपितृॠण समाजाने फेडणे आवश्यक आहे. आई-वडील हेच पुण्य, त्यांची सेवा करणे हीच काशी असल्याने वेगळ्या काशीयात्रेला जाण्याची आवश्यकता नाही. भारतामध्ये अहिल्यादेवींचे नाव टाळता येणार नाही. देशातील सर्व तीर्थक्षेत्रांमध्ये अहिल्यादेवींनी कामे केली आहेत. दिशाहीन भटक्यांना दिशा देण्याचे काम केल्याचे प्रतिपादन डॉ. सदानंद मोरे यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी विधायक कार्यसमितीद्वारे भटक्या विमुक्त जाती जमातीतील आदर्श माता-पिता सत्कार समारंभ नुकताच पार पडला. या वेळी मुंबई, पुणे, नाशिक, धुळे, जळगाव, उस्मानाबाद, परळी वैजनाथ, नांदेड, बीड, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील धनगर, भोई, वंजारी, गोसावी समाजातील ४० आदर्श माता-पित्यांचा सत्कार करण्यात आला.
ज्यांनी कष्टपूर्वक आपल्या मुलांना शिकविले अशा पालकांचा यामध्ये समावेश होता. या वेळी डॉ. चारुदत्त आपटे, अॅड. श्रीपाद पंचपोर यांचीही भाषणे झाली. संयोजक डॉ. सुधाकर न्हाळदे यांनी प्रास्ताविक केले. माणिक सोडनवर यांनी सूत्रसंचालन केले. शीतल कारंजे यांनी आभार मानले.