नागपूर :  राज्यात भाजपाची सत्ता आल्यास सोलापूर विद्यापीठाचे नामांतर करण्याचे आश्वासन धनगर समाजाला दिले होेते. त्यानुसार राज्य सरकार या विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव  देण्याचा निर्णय घेणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नागपुरात धनगर आरक्षण निर्णायक मेळाव्यात केली. धनगर आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने स्नेहनगर येथे हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

व्यासपीठावर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंधारण मंत्री राम शिंदे, पशुसंवर्धन व दुग्ध विकास राज्यमंत्री महादेव जानकर, धनगर समाज संघर्ष समितीचे संयोजक खासदार विकास महात्मे, आमदार नारायण कुचे, बाळासाहेब मिरकुटे, गणेश हाके, डॉ. राजीव पोतदार, बाबुराव शिंदे यांच्यासह धनगर आरक्षण संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
 
धनगर समाजात रोष असल्याने धनगर आरक्षण निर्णायक मेळाव्याला कशाला जाता असे सल्ले काही लोकांनी दिले. परंतु मी कुणाशी बेईमानी केलेली नाही. धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन भाजपाने दिले आहे. कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीत याबाबतची शिफारस करू शकलो असतो. ठराव करून केंद्राकडे प्रस्ताव पाठविता आला असता. परंतु संवैधानिक बाबींची पूर्तता करून धनगर समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घेऊ. आरक्षणाबाबतचा अहवाल टाटा इन्स्टिट्युट आॅफ सायन्स तयार करीत आहे. हा अहवाल अंतिम टप्प्यात आहे. डिसेंबरमध्ये तो तयार होईल, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

टाटा इन्स्टिट्युट आॅफ सायन्सने 20हून अधिक जिल्ह्यातील शेकडो गावात जाऊन अभ्यास केला. धनगर समाजाची निवेदने ग्राह्य धरली. पण काही लोक आदिवासींना भडकावण्याचे काम करीत आहे. धनगर समाजाला आरक्षण देताना आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. तसेच धनगर समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व वसतिगृहाची सुविधा राज्य सरकारमार्फत उपलब्ध करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.