राजगडावर दगडावरुन उडी मारताना डोक्याला जबर मार; स्थानिकांच्या मदतीने युवकाला जीवदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2023 19:10 IST2023-01-22T19:09:48+5:302023-01-22T19:10:02+5:30
रक्तस्राव झाला तरीही वेळेवर उपचार मिळाल्याने तरुणाच्या जीवाचा धोका टळला

राजगडावर दगडावरुन उडी मारताना डोक्याला जबर मार; स्थानिकांच्या मदतीने युवकाला जीवदान
वेल्हे : राजगड किल्ल्यावरील सुवेळा माचीवर पायी चालताना दगडावरुन उडी मारताना दगडाचा मार लागल्याने गंभीर झालेल्या चैतन्य संतोष किरवे (वय १७) रा वरवे बुद्रुक ता भोर या युवकाचे प्राण वाचविण्यात यश आले. स्थानिक मावळे कार्यकर्ते,व १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने जखमीला मदत केली. त्याला पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.
राजगडावर दुपारी दुर्घटना घडल्याची माहिती मिळताच वेल्हे येथील मावळा जवान संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ राजीवडे व रोहित नलावडे यांनी तातडीने गडावरील सुरक्षा रक्षक विशाल पिलावरे यांच्याशी संपर्क साधला. तो पर्यंत मित्र व काही पर्यटकांनी सुवेळा माचीवरुन चैतन्य याला राजगडावरील शिवरायांच्या राजसदरेवर आणले होते. विशाल पिलावरे बापु साबळे यांनी तातडीने स्ट्रेचर उपलब्ध केली. गडावर डागडूजीचे काम करणाऱ्या ,किरण शिर्के, रवि जाधव संदीप दरडिगे गडाचे काम खंडोबा माळावर स्ट्रेचर आणले. गडाच्या पायथ्याला तातडीने दाखल झालेले रुग्णवाहिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ.राहुल बोरसे व मदतनीस ओंकार देशमाने यांनी चैतन्य याच्यावर प्राथमिक उपचार केले.
डॉ.बोरसे म्हणाले, चैतन्य याच्या डोक्याला जबर मार लागला आहे. रक्तस्राव झाला आहे. मात्र वेळेवर उपचार मिळाल्याने त्याच्या जीवाचा धोका टळला आहे.