परिर्वतनाची ऐतिहासिक नांदी..सावित्रीबाई फुले!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2021 07:45 AM2021-01-03T07:45:55+5:302021-01-03T07:50:01+5:30

आजमितीला भारतीय स्त्रियांची गरूडभरारी सावित्रीबाई फुले यांनी त्यांच्या पंखात शिक्षणाचे जे बळ भरले आहे त्याचीच फलश्रुती आहे...

Historical precursor of change..Savitribai Phule! | परिर्वतनाची ऐतिहासिक नांदी..सावित्रीबाई फुले!

परिर्वतनाची ऐतिहासिक नांदी..सावित्रीबाई फुले!

googlenewsNext

भारतीय स्त्री शेकडो वर्षे शिक्षण आणि सामाजिक हक्कापासून वंचित होती. अनेक शतके रुढी परंपरेच्या जंजाळात जखडलेली होती. त्याकाळी पुरूषप्रधान संस्कृतीत स्त्रियांची अवहेलना पदोपदी पाहायला मिळत असत. या साऱ्या प्रश्नांची मूळ कारणे तेव्हा क्रांतीसूर्य जोतीराव फुले यांना अस्वस्थ करत होती. स्त्रियांच्या मनातील वेदनेचा हुंकार अचूक ओळखून त्यांच्या परिर्वतनासाठी शिक्षणाच्या नंदादीपातून समाजमन प्रज्वलित करण्यासाठी त्यानी सावित्रीला सुशिक्षित केले आणि एका दैदिप्यमान पर्वाची पहाट उदयास आली.. 

अतिशय खडतर कटूमय मार्गातून कणखर व संयमी मनाने स्त्री बलशाली झाली पाहिजे ह्या ध्यासातून त्यांनी केलेल्या अविरत प्रयत्नांपुढे समाजकंटकांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आणि शिक्षणाची दालने महिलांकरिता खुली करून त्यांना आत्मोन्नतीचा मार्ग दाखवला त्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंचा जीवनप्रवास साऱ्या विश्वाला प्रेरणादायी आहे.

आजमितीला भारतीय स्त्रियांची गरूडभरारी सावित्रीबाई फुले यांनी त्यांच्या पंखात शिक्षणाचे जे बळ भरले आहे त्याचीच फलश्रुती आहे. अनेक पिढ्यांचे परंपरेच्या बेड्या झुगारून आपल्या पतीच्या पुरोगामी परिर्वतनवादी विचाराला साथ देऊन स्वतः मध्ये बदल करणे म्हणजे सावित्रीबाईचे धाडसच म्हणावे लागेल. कारण आजही रूढी,परंपरा,व्रत-वैकल्य टिकवण्यासाठी स्त्रिया पुढाकार घेताना दिसून येतात. पण अठराव्या शतकात सावित्रीबाईचे हे पाऊल म्हणजे एक आश्चर्यच आहे.

राज्यात आज राबविण्यात येणाऱ्या अनाथ निराधार, वंचित तसेच संकटात सापडलेल्या महिला यांच्यासाठी सुरू केलेली सूतिकागृह, केंद्र व राज्य शासनामार्फत चालवली जाणारी सखी केंद्रे माहेर योजना, दत्तक विधान योजना, बालगृहे ही सावित्रीबाईच्या महिलांप्रती असलेल्या आत्मनिर्भरतेची साक्ष देतात.

सावित्रीबाई यांनी महिलांच्या शिक्षणाची कठीण काळात केलेली सुरूवात ही एक ऐतिहासिक परिर्वतनाची नांदी आहेच पण त्यांनी लिहिलेलं बावनकशी,  सुबोध रत्नाकर काव्य फुले यातून त्यांच्या मानवजाती प्रती असलेल्या सद्विचाराची जाणीव होते. 
       

        वाचे उच्चारी। तैसा क्रिया करी
        तीच नरनारी। पूजनीय
        सेवा परमार्थ। पाळी व्रत सार्थ
        होई कृतार्थ। । तेच वंद्य
        सुख दुःख काही। स्वर्थपणा नाही
        परहित पाही। तोच थोर
        मानवाचे नाते । ओळखती जे ते
        सावित्री वदते। तेच संत

सावित्रीबाईच्या विचारातून त्यांच्या जाती धर्मा पलीकडच्या वैश्विक कुटुंबाच्या संकल्पनेची प्रचिती येते. जोतीरावांच्यानंतर सत्यशोधक समाजाची धुरा समर्थपणे आपल्या खांद्यावर पेलून पतीचे अर्धवट कार्य, लिखाण कृतीच्या रूपाने पुढे घेऊन जाणारी आणि शेवटच्या श्वासापर्यंत इतरांच्या कल्याणाकरिता देह झिजवणारी सावित्रीबाई आमची राष्ट्र माता आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. 3 जानेवारी हा सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिन शिक्षिका दिन म्हणून साजरा करण्याचा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम नक्की अभिमानस्पद आहे.

महाराष्ट्रातील महिला भगिनींच्या वतीने या क्रांती जोतीस विनम्र अभिवादन..! 


- सुवर्णा पवार -

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, सांगली.

Web Title: Historical precursor of change..Savitribai Phule!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.