पुणे जिल्ह्यातील १५९ गावांना हाय अलर्ट! ग्रामीण भागात कोरोनाबाधितांच्या आकड्यात दिवसेंदिवस होतीये वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 04:31 PM2021-05-09T16:31:05+5:302021-05-09T16:41:10+5:30

वाढत्या रुग्णसंख्येमुळे नियमावली बदलली, कठोर उपाय योजना करण्याच्या यंत्रणेला सूचना

High alert to 159 villages in Pune district! In rural areas, the number of coronaviruses is increasing day by day | पुणे जिल्ह्यातील १५९ गावांना हाय अलर्ट! ग्रामीण भागात कोरोनाबाधितांच्या आकड्यात दिवसेंदिवस होतीये वाढ

पुणे जिल्ह्यातील १५९ गावांना हाय अलर्ट! ग्रामीण भागात कोरोनाबाधितांच्या आकड्यात दिवसेंदिवस होतीये वाढ

googlenewsNext
ठळक मुद्देरुग्णसंख्या वाढत असलेली १५९ गावे हायअलर्ट, तर रुग्णसंख्या कमी होत नसलेली १०६ गावे अलर्ट गावे म्हणून घोषित

पुणे: जिल्ह्याच्या ग्रामीण भागात लॉकडाऊन असूनही कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात येत नसल्याने नियमावलीत बदल करत रुग्णसंख्या वाढत असलेली १५९ गावे हायअलर्ट, तर रुग्णसंख्या कमी होत नसलेली १०६ गावे अलर्ट गावे म्हणून घोषित केली आहे.

यात जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांचाही समावेश करण्यात आला आहे. हाय अलर्ट व अलर्ट गावांत कोरोना व्यवस्थापनाची जबाबदारी ही उपविभागीय अधिकारी, तसेच घटना व्यवस्थापकांवर राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. राजेश देशमुख यांनी दिली आहे. यासाेबतच या गावांतील नागरिकांना अत्यावश्यक कामाव्यतिरीक्त गावातून बाहेर पडू नये, असे आदेश देण्यात आले आहेत.

पुणे आणि पिंपरीच्या तुलनेत ग्रामीण भागात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे अनेक गावे जिल्हा परिषदेेमार्फत हॉटस्पॉट क्षेत्र आणि प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले होते. कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी उपाय योजना करूनही संख्या आटोक्यात येत नव्हती. यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष  प्रसाद यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला याबाबत कठोर उपाय योजना करण्यासाठी सूचना केल्या होत्या. त्यानुसार सर्वेक्षण केले असता, ज्या ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायत या ठिकाणची रुग्णसंख्या वाढत आहेत अशी गावे हाय अलर्ट व ज्या ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत याठिकाणची रुग्णसंख्या कमी होत नाही ती अलर्ट गावे म्हणून घोषित करणे क्रम प्राप्त ठरल्याने त्यानुषंगाने संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रात रुग्णसंख्या कमी करण्याच्या उद्देशाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार १५९ गावे ही हाय अलर्ट, तर १०६ गावे ही अलर्ट म्हणून जाहीर करण्यात आली आहे.

या सर्व गावांना तालुकास्तरीय अधिकारी यांनी भेटी देऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. पोलीस प्रशासनाने वरील ग्रामपंचायत क्षेत्रात पाळत वाढवावी जेणेकरून विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची संख्या कमी होण्यास मदत होईल. तर आरोग्य विभागाने या सर्व गावांमध्ये लसीकरण लवकरात लवकर पूर्ण होईल याप्रमाणे नियोजन करावे. जेणेकरून कोरोना संसर्ग आटोक्यात आणणे शक्य होईल. असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

तर होणार फौजदारी कारवाई

हाय अलर्ट व अलर्ट गावांतील नागरिकांनी अत्यावश्यक कामाव्यतिरीक्त बाहेर पडू नये, आरोग्यविषयक कामकाज असेल तरच शक्यतो बाहेर पडावे. कुटुंबाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने घरात कुटुंबासमवेत असतानाही मास्कचा वापर करावा. याचबरोबर सहव्याधी असणारे नागरिक तसेच ज्येष्ठ नागरिक यांनी घराबाहेर पडू नये. अत्यावश्यक बाबींसाठी बाहेर पडल्यानंतर सुरक्षित अंतर, मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा अशा सूचना करण्यात आल्या आहेत. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम व साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात १३ नगरपालिका आणि ३ नगरपंचायती आहेत. या सर्व नगरपंचायतीतील रुग्णसंख्या ही अजूनही वाढतीच असल्याने त्यांचा समावेश हा हाय अलर्टमध्ये करण्यात आला आहे.

Web Title: High alert to 159 villages in Pune district! In rural areas, the number of coronaviruses is increasing day by day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.