शंभूराजांच्या समाधीवर हेलिकॉप्टरने होणार पुष्पवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 10:58 PM2019-04-02T22:58:54+5:302019-04-02T22:59:10+5:30

छत्रपती संभाजीमहाराज समाधीस्थळ : शासकीय मानवंदना, पुरस्कार वितरण व विविध कार्यक्रम

Helicopter to be held on Shambhu's samadhi | शंभूराजांच्या समाधीवर हेलिकॉप्टरने होणार पुष्पवृष्टी

शंभूराजांच्या समाधीवर हेलिकॉप्टरने होणार पुष्पवृष्टी

googlenewsNext

कोरेगाव भीमा : श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील छत्रपती संभाजीमहाराज यांच्या ३३० व्या बलिदानस्मरणदिनी शुक्रवारी (दि. ५) होणार असून सकाळी मूकपदयात्रा, शासकीय पूजा, शासकीय सलामी, हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, पुरस्कार वितरण, धर्मसभा, पालखी सोहळा, तसेच विविध कार्यक्रम आयोजिण्यात येणार असून यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात राहणार आहेत.

छत्रपती संभाजीमहाराज यांचे समाधीस्थळ असलेल्या श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील शंभू छत्रपतींच्या ३३० व्या बलिदानस्मरणदिनानिमित्त शंभूराजांची समाधी, कवी कलश, वीर शिवले यांच्या समाधीवर महाअभिषेक सकाळी सहा वाजता होणार आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्यावतीने महिनाभर बलिदान मास पाळण्यात येत असतो. या बलिदानमासाची सांगता मूक पदयात्रेने सकाळी ७ वाजता होणार आहे. सकाळी ८.३० वाजता शासकीय पूजा जिल्हाधिकारी नवल किशोर राम व पोलीस अधीक्षक संदीप पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभााकर गावडे यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. त्यानंतर धर्मवीर श्री शंभू छत्रपती पुण्यस्मरणानिमित्त हभप देहूकर यांचे कीर्तन होणार आहे. समाधीस्थळावर केईएम हॉस्पिटल यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. समाधीस्थळावर राज्यभरातून आलेल्या दिंड्या व पालख्यांचे आगमन झाल्यानंतर साडेअकरा वाजता शंभू छत्रपतींची समाधी व पूर्णाकृती पुतळा यांवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. त्यानंतर शासकीय सलामी देण्यात येणार आहे. त्यानंतर व्यंकोजीराजे भोसले यांचे १४ वे वंशज महाराज प्रतापसिंह सरफोजीराजे भोसले (तंजावर), प. पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी कणेरी मठ कोल्हापूर, ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांची धर्मसभा पार पडणार आहे. त्यानंतर पुरस्कार वितरण होणार आहे. यावेळी यावर्षीचा धर्मवीर छत्रपती श्री संभाजीमहाराज पुरस्कार हभप चारुदत्त आफळे व विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना देण्यात येणार आहे. शंभूभक्त अशोक भंडलकर, शंभूसेवा पुरस्कार नवी मुंबई येथील धर्मवीर शंभुराजे उत्सव मंडळ, शंभूभक्त डी. डी. भंडारे शंभूसेवा पुरस्कार पुणे येथील श्रीरंग कलादर्पण यांना व शंभूभक्त गेणू गणपत शिवले शंभूसेवा पुरस्कार तुळापूरचे माजी सरपंच ज्ञानेश्वर तुकाराम शिवले यांना प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी शंभूछत्रपतींवर धर्मवीर बलिदानगीताचे प्रकाशन कवी विनोद पाटणकर, गायक तुषार रिटे यांच्या उपस्थितीत प्रकाशन होणार आहे. त्यानंतर शिवशाहीर हेमंत मावळे यांचा शिवकालीन पोवाड्याचा कार्यक्रम होणार आहे.

वढूला तुकोबारायांच्या पालखीतील सर्व दिंड्या आणाव्यात
जगद्गुरू तुकोबाराय पालखी सोहळ्यास छत्रपती संभाजीमहाराजांनी संरक्षण दिले असल्याने शंभूछत्रपतींच्या ३३० व्या बलिदानस्मरणदिनी नतमस्तक होण्यासाठी देहू संस्थानतर्फे जगद्गुरू पालखी सोहळ्यातील सर्व दिंडीचालकांनी त्यांच्या दिंड्या आणण्याचे आवाहन करण्यात
आले आहे.

वढूला येणार राज्यभरातून शक्तीज्योत

वढू येथील शंभुराजांच्या समाधीस्थळावर नतमस्तक होण्यासाठी धर्मवीर संभाजीमहाराज पालखी सोहळा श्रीक्षेत्र किल्ले पुरंदर ते श्रीक्षेत्र वढू बुद्रुक - तुळापूर, धर्मवीर संभाजीमहाराज प्रतिष्ठान गोदाकाठ येथून पालखी, श्री शिरूर-हवेली प्रासादिक दिंडीची संगमेश्वर ते वढू बुद्रुक पालखी, पुण्यातून हेडगेवार ज्योत, आईसाहेब आध्यात्मिक ज्ञान विज्ञान संस्था वाडे बोल्हाई यांची किल्ले शिवनेरी ते वढू पालखी व राज्यभरातून असंख्य शंभुभक्त ज्योत घेऊन येणार आहेत.

Web Title: Helicopter to be held on Shambhu's samadhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.