आरोग्यमंत्री म्हणतात...दुसऱ्या लाटेची शक्यता कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:11 IST2020-12-08T04:11:38+5:302020-12-08T04:11:38+5:30
पुणे : गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या तुलनेने कमी झाली आहे. त्यामुळे दुसरी लाट येण्याची शक्यताही कमी ...

आरोग्यमंत्री म्हणतात...दुसऱ्या लाटेची शक्यता कमी
पुणे : गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या तुलनेने कमी झाली आहे. त्यामुळे दुसरी लाट येण्याची शक्यताही कमी असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. राज्यातील सार्वजनिक आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून निधी मागणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
साथी, युनायटेड नर्सेस असोसिएशन महाराष्ट्र, महाराष्ट्र नर्सेस फेडरेशन आणि जन आरोग्य अभियानच्या वतीने परिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर आयोजित वेबिनारमध्ये टोपे बोलत होते. या वेबिनारमध्ये विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, माजी आरोग्य महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे, प्रवीणा महादळकर, डॉ. अभय शुक्ला, डॉ. संगीता भुजबळ, सुमन टिळेकर, स्वाती राणे, शकुंतला भालेराव आदींनी सहभाग घेतला.
टोपे म्हणाले की, राज्याच्या एकुण अर्थसंकल्पातील पाच टक्के खर्च आरोग्यावर व्हायला हवा, असे नियोजन आयोगाने सुचविले आहे. पण सध्या हा खर्च एक टक्काही नाही. सार्वजनिक आरोग्य विषयी लोकांचे ठराविक मत तयार झाले आहे. हे मत बदलण्यासाठी उच्च दर्जाच्या सुविधा देत सरकारी रुग्णालयांना कॉर्पोरेट रुप द्यावे लागेल. सध्या रिक्त जागा भरण्याचाही प्रयत्न आहे.
चौकट
रिक्त पदांसाठी प्रयत्न करणार
“क्निनिकल एस्टॅब्लिशमेंट अॅक्टची आवश्यकता असून त्याबाबत अभ्यास करण्यासाठी समिती नेमण्याविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. परिचारिकांची वरिष्ठ स्तरावरील पदे तातडीने भरणे आणि परिचारिकांच्या अडचणी दुर करण्यासाठी प्रयत्न केले जातील.”
- डॉ. नीलम गोऱ्हे, उपसभापती, विधान परिषद
------------