पुणे : विमाननगर भागातील एका खासगी कंपनीतील महिलांच्या प्रसाधनगृहात लपून डोकावून पाहणाऱ्या सफाई कामगाराविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. खासगी कंपनीतील कर्मचारी तरुणीच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
अनिल दुकाळे (२५, रा. वडार वस्ती, मांजरी) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत खासगी कंपनीतील कर्मचारी तरुणीने विमाननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार २३ वर्षीय तरुणी ही विमाननगर भागातील एका खासगी कंपनीत कामाला आहे. आरोपी दुकाळे या कंपनीत गेल्या तीन ते चार महिन्यांपासून सफाई कामगार म्हणून काम करतो. सफाईविषयक कामे करणाऱ्या कंपनीकडून त्याला तेथे ठेवण्यात आले आहे. शनिवारी (दि. २६) रात्री तरुणी प्रसाधनगृहात गेली होती. प्रसाधनगृहातील दिवे बंद होते. आरोपी दुकाळे प्रसाधनगृहात लपून बसला होता. तरुणीने प्रसाधनगृहात गेल्यानंतर दिवे सुरू केले, असता दुकाळे चोरून डोकावत होता. ही बाब तरुणीच्या लक्षात आल्यानंतर तिने आरडाओरडा केला. कंपनीतील कर्मचाऱ्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. दुकाळे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हा जामीनपात्र असल्याने त्याला नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रवींद्र ढावरे करत आहेत.