दिवसाढवळ्या बंद घराचे कुलुप तोडून दागिन्यांसहित केले दहा लाख लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2022 19:54 IST2022-05-15T19:53:56+5:302022-05-15T19:54:09+5:30
राजगुरूनगर शहरालगत थिगळस्थळ येथे भरवस्तीतील घटना

दिवसाढवळ्या बंद घराचे कुलुप तोडून दागिन्यांसहित केले दहा लाख लंपास
राजगुरुनगर : दिवसाढवळ्या बंद घराचे कुलुप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे दहा लाख रुपायांचे सोन्याचे दागिने व रोकड लांबविल्याची घटना आज दि १५ रोजी राजगुरूनगरलगत थिगळस्थळ येथे घडली आहे. याबाबत लक्ष्मी अभिजीत शेळके ( रा.श्री स्वामी समर्थनगर थिगळस्थळ ता खेड ) यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध खेडपोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
थिगळस्थळ येथे समर्थनगर मध्ये शेळके या कुंटुबांसह राहतात. दि १४ रोजी सकाळी त्या आईला भेटण्यासाठी शिवणे (पुणे ) येथे गेल्या होत्या. दि १५ रोजी दुपारी दोन वाजता त्यांच्या मोबाईलवर शेजारील एका महिलेने फोन करुन सांगितले. तुम्ही घरी आला का, तुमचा घराचा दरवाजा उघडा आहे. शेळके या तत्काळ थिगळस्थळ येथे घरी येऊन पाहिले असता चोरीचा प्रकार उघकीस आला. अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोयंडा तोडुन आत प्रवेश करुन लोखंडी कपाट तोडून कपाटात ठेवलेले सुमारे आठ लाख चाळीस हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम दीड लाख रुपये असा ऐवज चोरट्यांनी लांबविला. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी सुर्दशन पाटील , पोलिस निरिक्षक सतीश गुरव, व पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन सीसी टिव्ही फुटेजची पाहणी केली. पुण्यावरुन चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथक बोलविण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.