Ajit Pawar News: राधाकृष्ण विखे पाटील यांच्या खात्याबद्दलचा एक प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवारांना विचारण्यात आला. विखे पाटलांच्या विभागाने काढलेल्या निर्णयाला तुमचा खरंच विरोध आहे का? असा प्रश्न विचारताच अजित पवार म्हणाले, 'अरे वेडे की काय तुम्ही?' त्यानंतर त्यांनी पुर्ण उत्तर दिलं. इतकंच नाही, तर तुला सकाळपासून कोणी भेटलं नाही का?, असा उलट सवालही केला. ते ऐकून सगळ्यांनाच हसू अनावर झाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पाटबंधारे खात्याकडून अतिक्रमणाची ड्रोनद्वारे पाहणी करण्यात येणार आहे. विखे पाटलांनी तसे आदेश काढले आहेत, पण अशा काही बातम्या आल्या आहेत की, तुमचा त्याला विरोध आहे. तुमचा काही विरोध आहे का?, असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवारांना पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत विचारण्यात आला होता.
ड्रोनद्वारे पाहणीला विरोध? अजित पवार म्हणाले...
उत्तर देताना अजित पवार म्हणाले, "अरे वेडे की काय तुम्ही? मी रिसोर्सेस (संसाधने) वाढवण्यासाठी रोज बसतोय. मी आता इथली पाहणी ड्रोनने करायला सांगतोय. उद्याच्याला पीक पाहणी पण ड्रोनने करायला सांगतोय. खरोखरच माझ्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान होईल, ते अचूकपणे येईल. आम्ही त्यात पारदर्शकता आणतोय. तुला आज सकाळपासून कुणी भेटलं नाही का?', असा प्रतिप्रश्न अजित पवारांनी प्रश्न विचारलेल्या पत्रकाराला करताच सगळ्यांना हसू अनावर झाले.
"...तर अजित पवारांवरही कारवाई होईल"
धनंजय मुंडेंना वेगळा न्याय का? असा प्रश्नही अजित पवारांना विचारण्यात आला. ते म्हणाले, "असे नाही. खूप जणांवर आरोप झाले. त्या आरोपांत तथ्य आहे की नाही, हे दिसल्याशिवाय... काही काही जण आरोपांमुळे व्याकूळ होऊन राजीनामा देतात. धनंजय मुंडेंचं स्पष्ट मत आहे की, माझा दुरान्वयानेही संबंध नाही."
"कुठल्याही एजन्सीला तपासायला द्या. आता तीन एजन्सी तपास करत आहेत, आणखी कुठल्या एजन्सीला लावा, असे ज्यावेळी ती व्यक्ती ठामपणे सांगते. काम करत असताना दोषी नसणाऱ्यांवर हल्ले होता कामा नये. मी पुन्हा सांगतो की, जर कोणी दोषी असेल... त्यात अजित पवार दोषी असेल, तरी त्यावर कारवाई होईल", असे उत्तर अजित पवारांनी दिले.