महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन अटळ - हर्षवर्धन पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2018 00:04 IST2018-12-17T00:04:17+5:302018-12-17T00:04:44+5:30
हर्षवर्धन पाटील : असत्य गोष्टी जास्त काळ टिकत नाहीत

महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन अटळ - हर्षवर्धन पाटील
बावडा : सत्तारूढ भाजपाचा पराभव होऊ शकतो,असा संदेश मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगढ या राज्यांतील निवडणूक निकालाने संपूर्ण देशाला मिळालेला आहे. त्यामुळे देशात होणाऱ्या आगामी लोकसभा व महाराष्ट्रात होणाºया विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ता परिवर्तन अटळ आहे, असा दावा काँग्रेस नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला.
शहाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, नुकत्याच झालेल्या पाचही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला मतदारांनी नाकारले आहे. शहरी भागात भाजपाला आजपर्यंत चांगले मतदान होत होते. गुजरात निवडणुकीतही शहरी भागातील मतदारांमुळेच भाजपाला सत्ता मिळविता आली. मात्र आता मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगढ या तिन्ही राज्यांत शहरी मतदारांचा आढावा घेतला असता भाजपाविरोधात स्पष्ट कौल देण्यात आल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसच्या सर्वधर्मसमभावाच्या विचारधारेला मतदारांनी पसंती दिली आहे. देशातील मतदारांनी भाजपाच्या घरवापशीचा निर्णय घेतलेला स्पष्टपणे दिसून येत आहे. असत्य गोष्ट लवकर पटते, मात्र ती जास्त काळ टिकत नाही, हे या निवडणुकीत भाजपाला मतदारांनी दाखवून दिलेले आहे. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे नेतृत्व सक्षम असल्याचे या निवडणुकीने देशाला तसेच जगातही दाखवून दिले आहे, असे त्यांनी नमूद केले. हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी सांगितले की, महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून भाजपाविरोधात समविचारी पक्षांना एकत्र आणले जात आहे. त्यादृष्टीने आम्ही समविचारी पक्षांशी बोलणी करीत आहोत. तसेच, काँग्रेस आघाडीच्या जागावाटपाची बैठक मुंबईत दि. २० व २१ डिसेंबर रोजी होणार आहे. आघाडीच्या जागावाटप चर्चेत काँग्रेस पक्षाकडून माझा सहभाग राहिलेला आहे.
महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तिन्ही राज्यांतील निवडणूक निकालाने नवचैतन्य आलेले आहे. शेतकरी, युवक, महिला, कामगार वर्गाने नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात मतदान केल्याचे या निवडणुकीत दिसून आले आहे, असेही हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. या वेळी नीरा-भीमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे आदी उपस्थित होते.
समविचारी पक्ष एकत्र
महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून भाजपाविरोधात समविचारी पक्षांना एकत्र आणले जात आहे.
त्यादृष्टीने आम्ही समविचारी पक्षांशी बोलणी करीत आहोत. तसेच, काँग्रेस आघाडीच्या जागावाटपाची बैठक
मुंबईत दि. २० व २१ डिसेंबर रोजी
होणार आहे.