Har Ghar Tiranga| मागणी तर वाढली, पण एवढे तिरंगे बनवणार कसे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 14:27 IST2022-08-08T14:27:04+5:302022-08-08T14:27:15+5:30
जिल्ह्यातील २० लाखांपेक्षा अधिक घरांवर तिरंगा फडकणार....

Har Ghar Tiranga| मागणी तर वाढली, पण एवढे तिरंगे बनवणार कसे?
पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबवला जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील २० लाखांपेक्षा अधिक घरांवर तिरंगा फडकणार आहे. त्यामुळे २० टक्क्यांनी तिरंग्याची मागणी वाढली आहे. पण एवढे तिरंगे बनविणार कसे? असा प्रश्न उभा ठाकला आहे. कमी कालावधीत झेंड्याची मागणी जास्त असल्याने झेंडा बनवताना काही त्रुटींसह तो बाजारात दाखल झाला आहे. कटिंग व्यवस्थित नसलेले, माप अथवा शिवण योग्य नसणारे झेंडे सध्या बाजारात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी त्यातील त्रुटी दूर करूनच तो फडकवावा, असे आवाहन विक्रेत्यांकडून करण्यात येत आहे.
केंद्र सरकारने हर घर तिरंगा उपक्रमाची घोषणा करताना जनतेपर्यंत झेंडे पोहोचवण्याची जबाबदारी देखील घेतली होती. त्यानुसार पोस्टामार्फत देखील झेंडे वितरित केले जात होते. मात्र तेथील झेंड्यांमध्येदेखील त्रुटी असल्याने नागरिकांनी खासगी विक्रेत्यांकडे गर्दी केली आहे. दरवर्षी झेंडा बनवणाऱ्या कारखान्यांसह यंदा बचत गट आणि गरीब देशबांधवांनी अत्यंत कमी वेळेत झेंडे बनवले आहेत. वाढती मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न या लोकांनी केला असल्याने ग्राहकांनी देखील झेंडा विकत घेतल्यानंतर त्यातील त्रुटी दूर करूनच तो फडकवावा.
असा बनतो झेंडा..
या उपक्रमासाठी लागणारा झेंडा रोटो आणि सॅटिन कापडापासून बनवला जात आहे. कारखान्यांमध्ये लेजर मशिनवर कटिंग होऊन झेंडा बनवला जातो. मात्र, यंदा प्रचंड मागणी असल्याने तळागाळातील नागरिकांनी झेंडा बनवला आहे. अचानक मागणी वाढल्याने माल नसल्याने जेवढे शक्य आहे तेवढे झेंडे बनवून वितरित केले जात आहेत.
खादीचा झेंडा १०० ते ४०० रुपयांना..
वर्षानुवर्षे शासकीय नियमानुसार बनवले जाणारे खादीचे झेंडे बाजारात १०० ते ४०० रुपयांपर्यंत विकले जातात. २ बाय ३, ३ बाय ४.५ आणि ४ बाय ६ या तीन मुख्य आकारांमध्ये हे झेंडे असतात. यंदा सरकारने जी प्रत्येकाला परवानगी दिली आहे, तो झेंडा इतर साध्या कापडापासून बनवला जात आहे. इतर प्रिंटेड कपडे बनवणारे कारखानेच दरवर्षी झेंडा बनवतात. दिल्ली, गुजरात आणि दक्षिण भारतात याचे कारखाने आहेत.