New Year 2023 | हटके ड्रेसकाेड, धम्माल मस्ती अन् बरंच काही
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 18:07 IST2022-12-30T18:06:42+5:302022-12-30T18:07:23+5:30
अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाकडूनही खबरदारीच्या उपाययाेजनांवर भर...

New Year 2023 | हटके ड्रेसकाेड, धम्माल मस्ती अन् बरंच काही
- मानसी जोशी/किमया बोराळकर
पुणे : नवीन वर्षाचं स्वागत आणि सरत्या वर्षाला निराेप देण्यासाठी तरुणाई सज्ज झाली आहे. हटके ड्रेसिंग करणार, पर्यटनाचा आनंद घेणार, फ्लोटिंग लॅम्प, बलून आकाशात सोडत जल्लाेष करणार, तसेच जंगी पार्टी करणार, अशी लांबलचक यादीच तरुणाईने तयार केली आहे. यात महिला आणि ज्येष्ठही मागे नाहीत. प्रत्येकजण आपापल्या साेयीनुसार जय्यत तयारी केल्याचे दिसत आहे. दुसरीकडे अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनही सज्ज झाले आहे.
काेराेनामुळे तब्बल दाेन वर्षांनंतर ही संधी मिळत आहे. त्यामुळे तरुणाईच नाही तर ज्येष्ठांपासून लहानांपर्यंत आणि महिलांनीही आपापली पसंती ठरवली असून, त्यानुसार नियाेजन करत आहेत. मागील दोन वर्षे कोरोनामुळे जल्लाेष करता आला नव्हता, त्यामुळे यंदा तरुणाईने जोरदार तयारी केली आहे. यात काही लाेक पर्यटनाची तयारी केली आहे, तर काहीजण पार्टी मोडमध्ये आहेत.
विविध रंगीत थीम फॉलाे :
अनेक ठिकाणी एका विशिष्ट कोडचे पालन करण्यासाठी सजावटीपासून ते विविध खाद्यपदार्थापर्यंत, तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या फॅन्सी कपड्याची थीम तरुणाई ठरवत आहे. न्यू इअर ही एक पार्टी आहे. त्यामुळे विशेषतः मुलींचा रंगीबेरंगी चमकदार आणि मिश्रण असणारे कपडे विकत घेण्यावर जास्त भर दिसून येत आहे. हा ट्रेंड माेठ्या प्रमाणावर फॉलो केले जात आहेत.
नवीन वर्ष नवी स्टाईल :
कोणत्याही ड्रिंक्सशिवाय पार्टी अपूर्ण, असा ट्रेंड आहे. यानुसार तरुणाई पार्टीची जंगी तयारी करत आहे. अनेक बार आणि क्लब मधून मनोरंजक स्पार्कलिंग ड्रिंक मेनूसह एक छान बार सेटअप केलेला आहे. नवीन वर्ष नव्या स्टाईलमध्ये वाजवण्यासाठी प्रीमियम काचेच्या सामानासह पूरक शॅम्पेन किंवा वाईनची बारीक बाटली, हे उत्तम कॉम्बिनेशन तरुणाई पसंत करते आहे.
शहरातील चित्र काय ?
कोरेगाव पार्क, बाणेर, बालेवाडी हायस्ट्रीट या ठिकाणी विविध सिंगर्स कॉन्सर्ट, स्टँडअप कॉमेडी, डीजे नाईट, फन गेम्स या सगळ्यांची जोरदार धम्माल पाहायला मिळणार आहे. अनेक फॅमिलींनी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला बाहेर जायचे प्लॅनिंग केली आहे.
या ठिकाणांना मिळतेय पसंती :
- सेलिब्रेशनसाठी तरुणाईची पहिली पसंती गोव्याला दिसत आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला गोवा जाण्याचा प्लॅन खूप लोकांनी केला आहे. तसेच वासोटा, पानशेत, पवना डॅम, ॲडव्हेंचर पार्क, अलिबाग, काशीद बीच आणि महाबळेश्वर आदी ठिकाणी छान पार्टी, अनेक प्रकारचे कार्यक्रम आणि धमाल असते.
- पुण्याच्या जवळपास असलेल्या ॲडव्हेंचर पार्कमध्ये न्यू इअरनिमित्त कमीत कमी पैशात जास्तीत जास्त आकर्षक राईड्स करण्यावरही अनेकांचा भर आहे.
- विशेष आकर्षण फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरचे आहे. या ठिकाणी सगळी तरुणाई एकत्र येऊन फ्लोटिंग लॅम्प, बलून आकाशात सोडून मोठ्या जल्लोषात नवीन वर्षांचे स्वागत करणार आहे.
न्यू इअरनिमित्त हॉटेल्सच्या आतील ॲम्बिअन्स तरुणाईला आकर्षित करतील, असा केला आहे. पोलिस विभागाने पहाटे पाचपर्यंत क्लब सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. ड्रिंक्स आणि फूड्ससाठी वेगवेगळे कॉम्बो पॅकेजेस ठरवले आहेत. अनलिमिटेड पॅकेजेस किंवा कव्हर चार्जेसदेखील मिळत आहे.
- जयेश नेरकर, हॉटेल ओनर
घरी ओपन टेरेस पार्टी अशी सगळी सोय केलेली आहे. टेरेसवर मस्त कुशन, लॅम्पस, ड्रिंक्स, स्नॅक्स असा सेटअप तयार केलेला आहे. फ्लॉटिंग लॅम्प आम्ही तयार केले आहेत. ते रात्री १२ वाजता आम्ही आकाशात सोडणार आहोत. तसेच डीजे आणि डान्ससाठी वेगळा सेटअप तयार केला आहे.
- दीपाली मोरे, तरुणी