लोणी काळभाेरला दोन लाखांचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:07 IST2021-02-05T05:07:42+5:302021-02-05T05:07:42+5:30
याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी गणपत पांडुरंग कोकणे यांनी फिर्यादी दिली. त्यावरू सुरेश मिलापचंद ओसवाल ...

लोणी काळभाेरला दोन लाखांचा गुटखा जप्त
याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी गणपत पांडुरंग कोकणे यांनी फिर्यादी दिली. त्यावरू सुरेश मिलापचंद ओसवाल ( वय ४४, रा. घर क्रमांक ५\६७२, माळीमळा, लोणी काळभोर) यांस अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओसवाल हा महाराष्ट्र राज्याचे अन्नसुरक्षा यांचे प्रतिबंधित आदेशानुसार राज्यात गुटखा, पानमसाल्यावर बंदी असतानाही त्याचा साठा करून विक्री करत असल्याची माहिती विभागाला मिळाली होती. त्यानुसार कोकणे हे अन्न सुरक्षा अधिकारी प्रद्युम्न विश्वनाथ आघाव, राहुल खंडागळे, अशोक ईलागेर, यांच्यासमवेत ओसवाल याच्या घरावर अचानक छापा घातला. यात त्यांना मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा आढळला. याबत ओसवालकडे प्रतिबंधित अन्नपदार्थाच्या खरेदी विक्रीबाबत वारंवार विचारणा करूनही त्याने त्याबाबत माहिती दिली नाही. तसेच अन्नपदार्थाच्या उत्पादन, साठा, वाहतूक, वितरण विक्रीस प्रतिबंध असल्याचे माहिती असतानाही त्याचा साठा त्याने केला होता. यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
चौकट
१ लाख ४३ हजार ७६० रुपये किमतीचे विमल पान मसाल्याचे ९९ ग्रॅमचे १ हजार १९८ पुडे, ३५ हजार ९४० रुपये किमतीचे वी - १ तंबाखूचे १ हजार १९८ पुडे, २४ हजार ७५० रुपये किमतीचे विमल पान मसाल्याचे १५४ ग्रॅमचे १२५ पुडे, २ हजार ७५० रुपये किमतीची वि-१ तंबाखू १२५ पुडे, ८ हजार ९७६ रुपये किमतीचे विमल पान मसाला १५४ ग्रमचे ४८ पुडे, १ हजार १८४ रुपये किमतीचे वि-१ तंबाखूचे ४८ पुडे, १० हजार ८० रुपये किमतीचे प्रीमियम आरएमडी पान मसाला २१० ग्रॅमचे पुडे व ११ हजार १०० रुपये किमतीचे एम सेंटेड टोबॅको १५ ग्रॅमचे ३७ पुडे असा एकूण २ लाख ३८ हजार ९४० रुपये किमतीचा गुटका पोलिसांनी जप्त केला.
चौकट
ओसवाल हा मोठा गुटखाकिंग
सुरेश मिलापचंद ओसवाल (जैन) हा या परिसरातील मोठा गुटखाकिंग असून यापूर्वी १७ जुलै २०१७ रोजी मध्यरात्री शिंदवणे घाटात त्याने कर्नाटकातून मोटारीतून गुटखा आणला होता. त्यास त्यावेळी अटक करण्यात आली होती. तसेच ८ लाख २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला होता. त्यानंंतर २८ सप्टेंबर २०१७ रोजी त्याने नायगाव (ता. हवेली) येथील मार्गवस्ती येथील एका घरात ठेवलेला ३ लाख ३६ हजार रुपये किमतीचा गुटका व पानमसाला जप्त करण्यात आला होता. तर ३१ जुलै २०१९ रोजी याच ठिकाणावरून ५ लाख ३५ हजार २० रुपये किमतीचा माल जप्त केला आहे. ओसवालवर त्यापूर्वीही अनेक वेळा अशीच कारवाई झाली होती. मोठ्या प्रमाणात गुटका व पानमसाला जप्त करण्यात आला होता. याप्रकरणी तो काही महिने येरावडा तुरुंगात जावून आला आहे. सध्या तो जामिनावर सुटला आहे.