बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी ‘माळेगाव’च्या गुरुशिष्यांविरोधात पक्षविरहित पॅनल उभा करण्याचा इशारा देत शड्डु ठोकला. माळेगाव कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ‘मलाही एकदा माळेगावमध्ये बघायचं आहे, की काय होतंय ते’ असा सुचक इशारा देखील दिला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी (दि. २३) गुरुशिष्यांनी अन्य सहकाऱ्यांसह उमेदवारी अर्ज दाखल करीत दंड थोपटले. त्यामुळे माळेगावमध्ये राजकारण तापण्याचे संकेत आहेत.
माझ्यासमोर ज्यांना लढायचं त्यांना लढू द्या, ज्यांना पॅनल करायचं त्यांना करू द्या. माझी हरकत नाही. मी देखील लढणार, पॅनल करणार आहे. समोरच्याला तुल्यबळ समजून लढणार, मलाही एकदा माळेगावमध्ये बघायचं आहे की काय होतंय ते, या निवडणुकीत आपण कोणावर उगाच अवलंबून राहणार नाही. सगळ्या यंत्रणा कामाला लावणार असून जे काय करायचे ते मी करणार असल्याचे सांगत निवडणुकीची रणनीती स्पष्ट केली. या पार्श्वभूमीवर माळेगावच्या राजकारणात अनेक वर्षे विरोधकांच्या भूमिकेत असलेले गुरु-शिष्य ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे, माजी अध्यक्ष रंजनकुमार तावरे यांनी अन्य सहकाऱ्यांसह उमेदवारी अर्ज दाखल केला. संपूर्ण पॅनल तयार झाला असून सहकार बचाव शेतकरी पॅनल हा पॅनलदेखील त्यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जाहीर केला.
यावेळी माध्यमांशी बोलताना तावरे म्हणाले, सहकार वाचविण्यासाठी चंद्रराव तावरे या वयात निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढविणार आहोत. आम्हीदेखील पक्षविरहित सर्वपक्षीय पॅनल तयार केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत एक भूमिका, तर माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत एक भूमिका चुकीची घेतली आहे. ती माळेगावचा सभासद मान्य करणार नाही. माळेगावची अवस्था ‘छत्रपती’प्रमाणे होण्याची भीती सभासदांना असल्याचे रंजनकुमार तावरे म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने आम्ही लोकसभा, विधानसभा निवडणुकीत महायुती धर्म पाळल्याचे तावरे म्हणाले. त्यामुळे माळेगावच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गुरुशिष्य आमनेसामने येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आगामी काळात माळेगावात राजकीय वातावरण चिघळण्याचे संकेत आहेत.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाच्या वतीने ‘माळेगाव’ कारखान्यासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लक्ष घालणार असल्याचे सांगितले होते. मात्र, माळेगाव कारखान्याबाबत अद्याप शरद पवार गटाच्या वतीने अद्याप कोणतीही राजकीय भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. हा गट उपमुख्यमंत्री पवार अथवा गुरुशिष्यांच्या जोडीला पाठबळ देणार, याबाबत उत्सुकता ताणली आहे. यावर तालुक्यातील राजकीय गणिते अवलंबून आहेत. सध्या माळेगाव कारखान्याची तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत.