Gunda Appa Londhe murder trial will be held daily at Yerawada Jail | गुंड आप्पा लोंढे खून खटल्याची सुनावणी येरवडा कारागृहात; लॉकडाऊननंतर पूर्णवेळ सुरू होणारा पहिला खटला

गुंड आप्पा लोंढे खून खटल्याची सुनावणी येरवडा कारागृहात; लॉकडाऊननंतर पूर्णवेळ सुरू होणारा पहिला खटला

ठळक मुद्देलॉकडाऊननंतर पूर्णवेळ सुरू होणारा पहिला खटला

पुणे : कुख्यात गुंड आप्पा लोंढे यांच्या खून खटल्याची सुनावणी २० जानेवारीपासून येरवडा कारागृहातील न्यायालयातच सुरू होणार आहे. सत्र व विशेष मोक्का न्यायाधीश ए. एस. सिरसीकर यांच्यासमोर येरवडा कारागृहाच्या आवारातील न्यायालयात ही सुनावणी दररोज होणार आहे. विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. विकास शहा कामकाज पाहणार आहेत.

या प्रकरणात मोक्कानुसार संतोष भीमराव शिंदे, नीलेश खंडू सोलनकर, राजेंद्र विजय गायकवाड, आकाश सुनील महाडीक, नितीन महादेव मोगल, विष्णू यशवंत जाधव, नागेश लक्ष्मण झाडकर, मनी कुमार चंद्रा ऊर्फ अण्णा, विकास प्रभाकर यादव, गोरख बबन कानकाटे, अण्णा ऊर्फ बबड्या किसन गवारी, प्रमोद ऊर्फ बापू काळुराम कांचन, सोमनाथ काळुराम कांचन, रवींद्र शंकर गायकवाड, प्रवीण मारुती कुंजीर यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

आप्पा लोंढे याचा भविष्यात जमीन, वाळूच्या व्यवहारात आणि इतर धंद्यांत अडसर होऊ नये म्हणून आरोपींनी त्याचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अप्पा लोंढे हा २८ मे २०१५ रोजी सकाळी मॉर्निग वॉकला जात असताना गोळ्या घालून त्यांचा खून करण्यात आला होता.

या खटल्यात आरोपींची संख्या अधिक आहे. तसेच, आरोपींनी आमच्या समोर खटल्याचे कामकाज चालावे. आम्हाला वकिलांशी बोलता येत नाही, असे सांगितले होते. त्यामुळे या सर्व आरोपींना बुधवारी जिल्हा न्यायालयात आणण्यात आले होते. आरोपींना दररोज जिल्हा न्यायालयात हजर करताना सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, तसेच न्यायालयात गर्दी होऊ शकते. त्यामुळे कारागृहात उभारण्यात आलेल्या न्यायालयात या खटल्याची दररोज सुनावणी घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे विशेष सरकारी वकील विकास शहा यांनी सांगितले.

लॉकडाऊननंतर पूर्णवेळ सुरू होणारा पहिला खटला
जनरल अरुणकुमार वैद्य यांची हत्या करणाऱ्या जिंदा सुखा यांच्यावरील खटल्याची सुनावणी येरवडा कारागृहात झाली होती. येरवडा कारागृहात मुख्य गेटजवळ कोर्ट तयार करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या काळात आरोपींना न्यायालयात आणणे अशक्य असल्याने या न्यायालयात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर आरोपींना हजर केले जात होते. यापूर्वी येथील न्यायालयात सुरक्षेच्या कारणावरून काही खटल्यांची सुनावणी घेण्यात आली आहे. लॉकडाऊननंतर न्यायालये पूर्णवेळ सुरू झाल्यानंतर कारागृह न्यायालयात खटल्याची नियमित सुनावणी होणारा हा पहिलाच खटला आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Gunda Appa Londhe murder trial will be held daily at Yerawada Jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.