Pune News : पुणे विमानतळावर पंढरपुरातील कॉन्ट्रॅक्टर आणि माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बागल यांच्या बॅगेत बंदुकीसह पाच काडतुसे शुक्रवारी रात्री सापडली. चंद्रकांत बागल हे पंढरपूरच्या गादेगाव येथील मूळचे असून, ते सध्या पंढरपुरात वास्तव्यास आहेत.
सोलापूर जिल्हा परिषदेत सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले. तर २०१४ साली राष्ट्रवादी पक्षाकडून बागल यांनी पंढरपूर विधानसभा निवडणूक लढविली होती. पुढे बागल यांनी भाजपत प्रवेश केला होता.
वाराणसीला जाण्यापूर्वीच झाली तपासणी
बागल हे पुण्याहून वाराणसीला विमानाने जाणार होते. त्यापूर्वी पुणे विमानतळावर झालेल्या तपासणीत त्यांच्या बॅगेत बंदुकीसह पाच जिवंत काडतुसे आढळली आहेत. त्यामुळे बागल हे बंदूक घेऊन वाराणसीला का निघाले? असा प्रश्न आता चर्चेला आहे.
बागल यांच्याकडे शस्त्राचा परवाना आहे. मात्र, हा परवाना महाराष्ट्र राज्यापुरता मर्यादित आहे. असे असताना विमानाने बंदूक घेऊन जाण्याची वेळ बागल यांच्यावर का आली? अशी चर्चा होत आहे. या प्रकरणात सी. पी. बागल यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.