पुणे: गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या आजाराचा पुण्यात शिरकाव झाला असून, रुग्णसंख्या २४ वरून ५९ वर पाेहाेचली आहे. यापैकी १२ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. यापैकी ३३ रुग्ण पुणे ग्रामीण, ११ रुग्ण पुणे मनपा, १२ रुग्ण पिंपरी-चिंचवड मनपा आणि ३ रुग्ण इतर जिल्ह्यांतील आहेत. यामध्ये ३८ पुरुष व २१ महिला आहेत. महापालिका व आरोग्य विभागाने खासगी रुग्णालयांकडून माहिती मागवली असता ही बाब समाेर आली आहे.
दरम्यान, जीबीएसचे कारण शोधण्यासाठी आराेग्य विभागाकडून सिंहगड रस्त्यावर रुग्ण सर्वेक्षणाबरोबरच पाणी व खाद्यपदार्थांचे नमुने गोळा करण्यात येत आहेत. खासगी डॉक्टरांनीही याबाबत सरकारी आरोग्य यंत्रणेला माहिती द्यावी, अशी माहिती आरोग्य विभागाच्या सहसंचालक डॉ. बबिता कमलापूरकर यांनी दिली.
सर्वाधिक रुग्णसंख्या सिंहगड रस्त्यावरील धायरी, नांदेड सिटी, किरकटवाडी या भागातील आहेत. आठ रुग्णांचे नमुने ‘एनआयव्ही’कडे तपासणीला पाठवले असता त्यांचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत. पुण्यातील वाढत्या ‘जीबीएस’च्या रुग्णसंख्या व उपाययोजनांबाबत डॉ. कमलापूरकर यांनी पुण्यातील आरोग्य अधिकाऱ्यांची बुधवारी (दि. २२) दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक घेतली. या बैठकीला ससून रुग्णालयाच्या बालरोग विभागप्रमुख डॉ. आरती किणीकर, ससूनच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश कार्यकर्ते, महापालिकेच्या आरोग्यप्रमुख डॉ. नीना बोराडे व इतर आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
डॉ. नीना बोराडे म्हणाल्या, बहुतांश रुग्ण हे सिंहगड रस्त्यावरील असून, यापैकी काही रुग्णांना दूषित पाणी पिल्याने उलट्या, जुलाब याचा त्रास झाल्याचा इतिहास आहे. त्यानंतर त्यांना ‘जीबीएस’चे लक्षणे दिसून आली आहेत. हे रुग्ण मुठा नदीकाठच्या भागातील आहेत.
जीबीएस आजाराचे कारण शोधण्यासाठी सिंहगड भागात सर्वेक्षणाबरोबरच पाण्याचे व खाद्यपदार्थांचे नमुने गोळा करण्यात येत आहेत. सरकारी व खासगी डॉक्टरांनीही असे रुग्ण आढळल्यास सरकारी आरोग्य यंत्रणेला माहिती द्यावी, नागरिकांनी स्वच्छ व उकळून पाणी प्यावे, त्याच बरोबर घरातील आणि परिसरातील स्वच्छता राखावी, बाहेरचे अन्नपदार्थ खाऊ नयेत, क्लोरीनयुक्त पाणी प्यावे. - डॉ. बबिता कामलापूरकर, सहसंचालक, आरोग्य विभाग