Great! You are our 'frontline workers'; Societies in Pune take responsibility for vaccinating their 'people' | तुम्हीच 'फ्रंटलाईन वर्कर्स'; पुण्यातील सोसायट्यांनी उचलली 'आपल्या माणसां'च्या लसीकरणाची जबाबदारी

तुम्हीच 'फ्रंटलाईन वर्कर्स'; पुण्यातील सोसायट्यांनी उचलली 'आपल्या माणसां'च्या लसीकरणाची जबाबदारी

दीपक कुलकर्णी- 

पुणे : पुणे, मुंबईसह राज्यात कोरोना दिवसेंदिवस भयावह रूप धारण करतो आहे. त्याला रोखण्यासाठी सरकार आणि प्रशासन यंत्रणा आपापल्यापरीने सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.यात लसीकरणाची मोहीम सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याचवेळी हिंजवडी, माण परिसरात एक स्तुत्य उपक्रम राबविला जात आहे. रहिवाशांनी परिसरातील शासनाकडून दुर्लक्षित अशा ४५ वर्षांपुढील 'फ्रंटलाईन वर्कर्स'च्या लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे.

पुणे,पिंपरी चिंचवड परिसरात कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. आणि यावेळी मोठमोठ्या सोसायट्या, इमारती कोरोनाचा हॉटस्पॉट असल्याचे समोर येत आहे.परंतू, याही विदारक  परिस्थितीत सोसायट्यांचे सुरक्षारक्षक, सफाई कामगार, कचरा गोळा करणारे, घरातील कामवाल्या महिला जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत  आहे.त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे कर्तव्य समजून  हिंजवडी, माण परिसरातील काही सोसायट्यांनी ४५ वर्ष पूर्ण केलेल्या फ्रंटलाईन वर्कर्स च्या लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. 

याबाबत रहिवासी रवींद्र सिन्हा म्हणाले, मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये सुरक्षारक्षक,सफाई कामगार,कचरा वेचक यासारखी अनेक मंडळी कोरोनाकाळात देखील आपले काम करत आहे. त्यांच्यात ४५ वर्षांपुढील अनेक जण आहेत. त्यांना कोरोना लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करणे जमत नाही. तसेच त्यांच्या ड्युटीच्या वेळेमुळे तिथे जाणे कठीण होते. यासाठी काही सोसायट्यांनी पुढाकार घेतला असून लसीकरणाच्या प्रक्रियेतील नोंदणीपासून ते तिथे घेऊन जात लसीकरण पूर्ण करत आहोत. आतापर्यंत जवळपास १००हुन अधिक अशा वर्कर्सचे लसीकरण करण्यात आले आहे. अधिकाधिक सोसायट्यांनी आपल्या भल्यासाठी काम करणाऱ्या या फ्रंटलाईन वर्कर्स साठी असा उपक्रम राबविणे गरजेचे आहे.

या उपक्रमाचा भाग असलेली मेगापोलिश सोसायटीचे अंशुल गुप्ता म्हणाले,मोठंमोठ्या टाऊनशीप मध्ये साधारण २० ते ५० फ्रंटलाईन कर्मचारी काम करत असतात.त्यांच्या आरोग्याला धोक्यात घालून ते आपल्या कुटुंबाची काळजी घेत असतात. याचीच जाणीव ठेवून आम्ही आमच्या सोसायटीमधील ४५वर्षांच्या पुढील कामगारांचे लसीकरण पूर्ण करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. यात आमचे मॅनेजरसह इतर शक्य असलेले सभासद या लोकांना घेऊन लसीकरण केंद्रावर जातात. तिथे सर्व प्रक्रिया पूर्ण  करून लसीकरण पूर्ण केले जाते.

....
या फ्रंटलाईन वर्कर्सच्या लसीकरणासाठी वयोमर्यादेची अट शिथिल करावी...

केंद्र व राज्य सरकारने आता सफाई कामगार, सुरक्षारक्षक, कचरा वेचणारे, कामवाल्या महिला यांना फ्रंटलाईन वर्कर्सच्या पंक्तीत आणून त्यांच्या लसीकरणाला परवानगी द्यावी. ही परवानगी मिळाली तर लसीकरण मोहीम अधिक व्यापक होईल.आणि या माणसांची कुटुंब सुरक्षित होण्यास मोठा हातभार लागेल.
रवींद्र सिन्हा, रहिवासी.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Great! You are our 'frontline workers'; Societies in Pune take responsibility for vaccinating their 'people'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.