सरकार... तक्रार करायची कुठे? ‘आमची मुलगी’ वेबसाइट चार वर्षांपासून बंदच
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 08:44 IST2023-08-29T08:44:15+5:302023-08-29T08:44:55+5:30
ही वेबसाइट चार वर्षांपासून बंदच असून, ती सुरू हाेण्याची शक्यताही मावळल्याने गर्भातच कळ्या खुडण्यासाठी माेकळे रान झाल्याचे दिसून येत आहे.

सरकार... तक्रार करायची कुठे? ‘आमची मुलगी’ वेबसाइट चार वर्षांपासून बंदच
- ज्ञानेश्वर भाेंडे
पुणे : प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंध (पीसीपीएनडीटी) कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासनाने ‘आमची मुलगी’ ही वेबसाइट तयार केली. यावर लिंगनिदान करणाऱ्या सोनोग्राफी केंद्राची, डाॅक्टरांची तक्रार करता येते; परंतु, ही वेबसाइट चार वर्षांपासून बंदच असून, ती सुरू हाेण्याची शक्यताही मावळल्याने गर्भातच कळ्या खुडण्यासाठी माेकळे रान झाल्याचे दिसून येत आहे.
अनधिकृतरीत्या सुरू असलेल्या गर्भपाताविरोधात कोणाला तक्रार करावयाची असेल किंवा काही माहिती हवी असेल, तर ती www.amchimulgi.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध हाेत असे. प्रजनन आणि माता आरोग्य सुधारण्यासाठी कार्यरत असलेल्या ‘युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड’ (यूएनएफपीए) या संस्थेकडून २०११ मध्ये ही वेबसाइट सुरू केली हाेती. ती हाताळण्याची जबाबदारी ‘परामर्श सोल्युशन्स’ या संस्थेला दिली होती.
तीन वर्षांपासून बैठकही झाली नाही
एकतर मुलींची संख्या कमी झाली आहे. लग्नासाठी मुलगी मिळत नाही म्हणून मुले माेर्चे काढत आहेत, तरीही शासन दखल घेत नाही. गर्भलिंग निदानाबाबत स्टेट सुपरवायजरी बाेर्डची मीटिंग गेल्या तीन वर्षांपासून झाली नाही. ‘आमची मुलगी’ या वेबसाइटला जर संस्थेने फंडिंग थांबवले हाेते, तर शासनाने का सुरू कले नाही. पुन्हा एकदा वेबसाइट सुरू करावी.
- वर्षा देशपांडे, केंद्रीय सदस्य, नॅशनल इन्स्पेक्शन अँड माॅनिटरिंग कमिटी
पुन्हा सुरू हाेण्याची शक्यता नाही !
हे संकेतस्थळ पूर्ववत करण्याच्या अनुषंगाने आराेग्य विभागाने ‘परामर्श साेल्युशन्स’ या संस्थेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु तो होऊ शकला नाही. वेबसाइटचे सर्व टेक्निकल डिटेल त्यांच्याकडेच आहेत. ते पुन्हा मिळणेही अवघड असल्याची माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली.
वेबसाइट का बंद पडली?
‘यूएनएफपीए’कडून आराेग्य विभागाला आर्थिक साहाय्य मिळत हाेते, ते २०१९ पासून थांबवले गेले. त्यामुळे संकेतस्थळाला देण्यात येणारे आर्थिक साहाय्यही २०१९ पासून बंद केले गेले. त्याचदरम्यान महाराष्ट्र शासनाच्या आराेग्य व कुटुंब कल्याण विभागानेही ही वेबसाइट सुरू राहण्यासाठी काही निधी दिला नाही. परिणामी २०१९ पासून ही वेबसाइट बंदच आहे.
केवळ हेल्पलाइनवरच करा तक्रार
गर्भलिंग निदान याबाबत तक्रार करण्यासाठी १८००-२३३-४४७५ ही हेल्पलाइन आहे. त्यावर तक्रार करता येते. काेणत्याही जिल्ह्यातून तक्रार आल्यास ती नाेंदवून घेऊन ती पुढे संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा शल्यचिकित्सकांना पाठवली जाते.