१९ जुलै रोजी श्री संतशिरोमणी ज्ञानेश्वर माऊली, आळंदी, श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज, देहू आणि सासवड येथील श्री संत सोपानकाका महाराज व संत श्री चांगावटेश्वर या चार पालख्यांना जिल्हा प्रशासनाने परवानगी दिलेली आहे. परवानगीनुसार प्रत्येकी दोन बसेसमधून चाळीस वारकरी एका पालखी सोबत पंढरपूरला विठ्ठल रुखुमाईच्या दर्शनासाठी जाणार आहेत. त्यांचे प्रस्थानाचे मार्गही ठरवण्यात आले आहेत.
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी होऊ नये म्हणून या पालख्यांच्या मार्गावरील यवत, वरवंड, पाटस, रोटीघाट, उंडवडी, सुपे, बारामती, सणसर, लासुर्णे, निमगाव केतकी, इंदापूर बावडा, सराटी, तसेच दिवेघाट, सासवड, जेजुरी, नीरा, निंबुत, सोरटेवाडी, सुरवड, भुलेश्वर घाट, चौफुला, भिगवण या गावांत कलम १४४ नुसार पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. या जमावबंदीतून केवळ अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक वस्तू पुरवठा करणारी वाहने, पालखीसोबत असणारी परवानगी असलेली वाहने, व्यवस्थापन जबाबदारी देण्यात आलेली वाहने वगळण्यात आले आहेत.
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचे आदेश ही जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिलेले आहेत.