शासकीय कामे होणार एका क्लिकवर ! शासकीय अधिकारी साहित्य संमेलनात चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 06:47 IST2024-12-23T06:47:46+5:302024-12-23T06:47:54+5:30
माहितीचे (डेटाबेस) संकलन मोठ्या प्रमाणात झाल्याने अनेक शासकीय कामे एका क्लिकवर

शासकीय कामे होणार एका क्लिकवर ! शासकीय अधिकारी साहित्य संमेलनात चर्चा
पुणे: शासनाच्या दैनंदिन कामकाजात तसेच माहितीचे जतन करण्यासाठीही कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर प्रभावीपणे होत आहे. या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वापरण्यास सोपे आणि उत्तम अॅप्सचीही निर्मित होते. यामुळे प्रशासकीय कामकाजात मानवी हस्तक्षेपाचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. माहितीचे (डेटाबेस) संकलन मोठ्या प्रमाणात झाल्याने अनेक शासकीय कामे एका क्लिकवर होण्यास मदत होणार आहे, असे मत चर्चासत्रात मान्यवरांनी व्यक्त केले. मराठी भाषा संवर्धन समिती, पुणे महापालिका व संवाद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनात 'कृत्रिम बुद्धिमत्ता, प्रशासन व साहित्य' विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ओमप्रकाश यादव, भूमापन उपसंचालक कमलाकार हट्टेकर, नगर भूमापन उपसंचालक डॉ. राजेंद्र गोळे, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांचा सहभाग होता. त्यांच्याशी वरिष्ठ अधिव्याख्याता विकास गरड यांनी संवाद साधला.
डॉ. ओमप्रकाश यादव म्हणाले, कार्यप्रणाली सहज सोपी व्हावी म्हणून स्वतः अनेक अॅप्स तयार केली आहेत आणि यशस्वीपणे या अॅप्सचा वापर करत आहे. डिजिटल धोके-तोटे ओळखण्यासाठी तंत्रस्नेही असणे तसेच जागरूक असणे आवश्यक आहे. कमलाकर हट्टेकर म्हणाले, विविध विषयांचा अभ्यास करताना तंत्रस्नेही असण्याची गरज लक्षात आली. यातूनच विभागाच्या सुलभ कामकाजाच्या गरजा लक्षात घेऊन तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला. यातून इ- मॅपिंग, डिजिटल क्रॉप सर्व्हे अशा प्रणाली विकसित केल्या.
अचूकतेत वाढ
सतीश बद्धे म्हणाले, शासकीय कामकाजात विविध प्रकारच्या माहितींचे संकलन मोठ्या प्रमाणात करावे लागते, याकरिता तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर केल्यास काम सुकर होते. हे लक्षात घेऊन कोरोना काळात महत्त्वाच्या माहितीचे संकलन मोठ्या प्रमाणात केले. विविध शासकीय अभियान राबविताना माहिती एका क्लिकवर मिळत गेल्याने कामाची गती आणि अचूकता वाढीस लागली.