government job recruitment MahaPortal's online method problematic for student | शासकीय भरतीसाठी महापोर्टलची ऑनलाईन पद्धत विद्यार्थ्यांची डोकेदुखी 
शासकीय भरतीसाठी महापोर्टलची ऑनलाईन पद्धत विद्यार्थ्यांची डोकेदुखी 

ठळक मुद्देमहापोर्टलमार्फत सुरू असलेल्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या अनेक तक्रारी खासगी सायबर केंद्रामध्ये जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांचे संगणक जवळ ठेवून कॉपी प्रकार

प्रशांत ननवरे - 
बारामती :  राज्य शासनाच्या विविध विभागांच्या नोकरभरतीच्या परीक्षा महापोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जात आहे. शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत ही प्रक्रिया केली जाते. शासनाच्या सर्वच विभागाच्या परीक्षा या महापोर्टलवर घेतल्या जात आहेत. मानवी हस्तक्षेप टाळावा, परीक्षा वेळेवर लवकर पार पाडावी आदी हेतूने परीक्षा देण्यासाठी वापर होणारी महापोर्टलची पद्धत   विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरली आहे. 
शासनाने ७२ हजार जागांची भरती जाहीर केली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील भरती सुरू आहे. मात्र, महापोर्टलमार्फत सुरू असलेल्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या अनेक तक्रारी येत आहेत. एकाच पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेला संगणकाच्या कमी उपलब्धतेमुळे वेळ लागतो. यामध्ये अनेक दिवसांचा कालावधी देखील जातो. एकाच वेळी सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा देता येत नाही. त्यातून काहींच्या वाट्याला सोपा तर काहींच्या वाट्याला अवघड पेपर येतो. त्यावर परीक्षेची गुणवत्ता ठरली जाते. परिणामी विद्यार्थी या  पद्धतीमुळे नाखुश आहे. शासकीय परीक्षा खासगी सायबर कॅफेत घेतली जात असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यामुळे या ठिकाणी सामुहिक कॉपी प्रकार वाढण्याची भीती विद्यार्थी वर्गातून व्यक्त होत आहे. खासगी सायबर केंद्रामध्ये जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांचे संगणक जवळ ठेवून कॉपी प्रकार होत असल्याची विद्यार्थ्यांची माहिती आहे. त्यातून गुणवंत विद्यार्थ्यांचे नुकसान होते. एकप्रकारे हायटेक कॉपीचा हा प्रकार असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. प्रामाणिक अभ्यास करणारा विद्यार्थी या पद्धतीमुळे निराश होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत सुरू केलेल्या महापोर्टलद्वारे खासगी सायबर केंद्रावर परीक्षा घेत आहे. या ठिकाणी प्रशिक्षित मनुष्यबळ नसल्यामुळे गैरप्रकार होण्याची भीती आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेशिवाय होणाऱ्या परीक्षा या पोर्टलवर घेण्यात येत आहेत. त्यामुळे  एमपीएससीच्या पार्श्वभूमीवर स्वायत्त मंडळ निर्माण करून परीक्षा घ्याव्यात. शासनाने पूर्वी  प्रमाणेच आॅफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी जोर धरत आहे. 
.......
* पूर्वीचीच पद्धत होती बरी : विद्यार्थ्यांच्या भावना
पूर्वी ऑफलाईन पद्धतीमुळे विद्यार्थ्याला त्याचे गुण, त्याने सोडविलेले प्रश्न आदी माहिती मिळत असे. त्यामुळे तुलनेने आॅफलाईन पद्धत विद्यार्थ्यांसाठी पारदर्शी होती. गरज भासल्यास विद्यार्थ्यांना न्यायालयात त्यांच्या उत्तर पत्रिका पुरावा स्वरूपात सादर करणे शक्य होते. मात्र, महापोर्टलमुळे परीक्षेचा कोणताही पुरावा विद्यार्थ्यांच्या हाती राहत नाही. न्यायालयात जाण्यासाठी असणारा मूळ आधार हरविल्याची विद्यार्थ्यांची भावना आहे.
......
महापोर्टलमध्ये संगणकावर शुल्काची झालेली वाढ सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परवडणारी नाही. शासनाच्या वनविभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी शासकीय परीक्षा नवीन पद्धतीद्वारे घेण्यात येत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र, प्रश्नपत्रिका बनविणे, परीक्षा केंद्र सुचविणे, परीक्षा घेणे, उत्तर पत्रिका तपसणे, निकाल लावणे ही सर्व कामे महापोर्टल करीत आहे. 
.........

Web Title: government job recruitment MahaPortal's online method problematic for student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.