सर्वसामान्यांची सकाळ 'गोड' होणार! राज्यातील रेशन दुकानात आता चहा पावडर मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 07:00 PM2021-08-12T19:00:10+5:302021-08-12T19:09:06+5:30

सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात आता स्वस्त धान्य दुकानात चहा पावडर मिळणार आहे.

Good news for tea lovers! Tea powder will now be available at ration shops in the state | सर्वसामान्यांची सकाळ 'गोड' होणार! राज्यातील रेशन दुकानात आता चहा पावडर मिळणार

सर्वसामान्यांची सकाळ 'गोड' होणार! राज्यातील रेशन दुकानात आता चहा पावडर मिळणार

googlenewsNext

बारामती : सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात आता स्वस्त धान्य दुकानात चहा पावडर मिळणार आहे. विविध अन्नधान्याबरोबरच चक्क चहा पावडर मिळणार असल्याने शासनाने सर्वसामान्यांना चहाची तलफ भागविण्याची सोयच जणु केली आहे. याबाबत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे अप्पर सचिव गजानन देशमुख यांनी गुरुवारी(दि. १२) शासन निर्णय जाहीर केला आहे. 

राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन फेडरेशन ऑफ इंडिया लिमीटेड (नाफेड) या अंतर्गत उत्पादित होणाऱ्या उत्पादनाचे वितरण राज्यातील सर्व अधिकृत रास्तभाव शिधावाटप दुकानामध्ये विक्रीसाठी ठेवण्याची विनंती केली होती. संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने याबाबत केलेल्या विनंतीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय राज्यातील सर्व अधिकृत स्वस्त धान्य दुकानदारांचे उत्पन्न वाढावे. सर्व सामान्यांना चहा पावडरचे स्वस्त किंमतीत दर्जेदार उत्पादन मिळावे. यासाठी सर्व रास्त भाव दुकानांमध्ये ‘नाफेड ’ अंतर्गत चहा पावडर उत्पादन विक्रीसाठी ठेवण्यास परवानगी देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. अखेर आज हा निर्णय घेण्यात आला आहे.

‘नाफेड’ या ब्रँड अंतर्गत उत्पादीत होणारी चहा पावडर उत्पादने राज्यातील सर्व अधिकृत स्वस्त धान्य दुकानामध्ये विक्रीसाठी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. संबंधित ब्रँड त्यांच्या वितरकांमार्फत राज्यातील रास्तभाव दुकानापर्यंत वितरित करण्यात येणार आहे. तसेच, त्यांच्यामार्फत वितरीत करण्यात येणाऱ्या चहा पावडरच्या उत्पादनावर विक्रीपोटी मिळणाऱ्या कमिशनसाठी संबधित दुकानदारांनी योजनेच्या वितरकांसह 'नाफेड 'च्या कार्यालयाशी परस्पर संपर्क साधणे आवश्यक आहे. हा व्यवहार नाफेड व संबधित दुकानदार यांच्यामध्ये राहील. यात शासनाचा कोणताही सहभाग अथवा हस्तक्षेप राहणार नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
 

Web Title: Good news for tea lovers! Tea powder will now be available at ration shops in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.