पेस्ट बनवून सोन्याची तस्करी; महिलेला विमानतळावर पकडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2018 22:34 IST2018-11-18T22:33:49+5:302018-11-18T22:34:10+5:30
डॅनटसा ज्युनेका जॉन असे या महिलेचे नाव आहे.

पेस्ट बनवून सोन्याची तस्करी; महिलेला विमानतळावर पकडले
पुणे : पॉलिथिनच्या पिशवीमध्ये सोन्याची पेस्ट करुन येताना एका महिलेला पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी पकडण्यात आले. तिच्याकडून किंमत ९० लाख ४४ हजार रुपये किंमतीचे २ किलो ८९१ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. सीमा शुल्क विभागाकडून ही कारवाई करण्यात आली.
डॅनटसा ज्युनेका जॉन असे या महिलेचे नाव आहे. ही महिला दुबईहून स्पाइस जेटच्या विमानाने रविवारी सकाळी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर आली. सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना तिचा संशय आल्याने त्यांनी तिची तपासणी केली. त्यात तिने कमरेला बेल्टच्या आधाराने चार पॉलिथिनच्या बॅग बांधलेल्या आढळून आल्या. त्यात या पिशव्यामध्ये सोन्याची पेस्ट लपवून आणल्याचे आढळून आले. तिच्या जवळील चार प्लॅस्टिक बॅगमध्ये २ किलो ७७१ ग्रॅम वजनाचे आणि ९० लाख ४४ हजार २३५ रुपये किमतीचे सोने आढळून आले. तिच्याविरुद्ध सीमा शुल्क कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू असल्याचे सीमाशुल्क विभागाच्या अधिकायांनी सांगितले. ही कारवाई उपायुक्त के आर रामाराव, हर्षल मेटे, अधिक्षक भगवान शिंदे, एस़ एस़ खैरे, एस़ व्ही़ झरेकर, सतीश सांगळे, निरीक्षक संगीता बाळी, सुषमा जाधव, राजेंद्र मीना, शिवाजी वाळू, देशराज मीना, हवालदार एस एस निंबाळकर यांनी केली.
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर दर महिन्याला किमान एक तरी तस्करी करुन सोने आणण्याचा प्रकार उघडकीस येत आहे. १७ ऑगस्ट रोजी दुबईहून आलेल्या प्रवाशांकडून ३ कोटी रुपयांची ८६ सोन्याची बिस्किटे पकडण्यात आली होती.