पुणे : उदे गं अंबे उदे जय घोषात सोमवार (दि.२२) पासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. आकर्षक फुलांची आरास आणि विद्युत रोषणाई अन् दहा दिवस भरगच्च कार्यक्रम अशा चैतन्यपूर्ण आणि आनंदी वातावरणात यंदाचा नवरात्र उत्सव साजरा होत आहे. सकाळी मंदिरांमध्ये विधिवत आणि पारंपरिक पद्धतीने घटस्थापना होणार असून, त्यानंतर दिवसभर धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
पारंपरिक पद्धतीने घटस्थापना मंदिरांच्या आहे. पदाधिकारी आणि विश्वस्तांच्या उपस्थितीत होणार आहे. तसेच यावेळी सनई-चौघडे आणि प्रवेशद्वारावर रांगोळी...असे प्रफुल्लित करणारे वातावरण मंदिरांमध्ये पाहायला मिळणार असून, भजनी मंडळांच्या भजनाने वातावरण भक्तिमय होणार आहे. सायंकाळी काही ठिकाणी देवीची मिरवणूकही निघणार आहे. तसेच बऱ्याच मंडळांनी भाविकांसाठी महाप्रसाददेखील ठेवला आहे. एकूणच उत्साहात आणि भक्तिभावाने नवरात्रोत्सव आरंभ होतानाचे चित्र सर्वत्र दिसत आहे.
चतृ:श्रृंगी देवी मंदिर देवस्थान
श्री देवी चतुःश्रृंगी मंदिर ट्रस्टतर्फे यावर्षीचा नवरात्रोत्सव दि. २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करणार आहेत. मागील शंभर वर्षांपासून चालत आलेली परंपरा कायम ठेवत, मंदिर ट्रस्टने भाविकांसाठी विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे योग्य नियोजन केले आहे. नवरात्रोत्सवाची घटस्थापना सोमवारी सकाळी ८.३० वाजता मंदिर व्यवस्थापक विश्वस्त रवींद्र अनगळ यांच्या हस्ते होणार आहे. तसेच यंदा मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असून, सभामंडपाचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. हा नवीन सभामंडप पूर्वीपेक्षा दुप्पटीने मोठा आहे. यामुळे भाविकांना व्यवस्थित दर्शन घेता येईल, तर गणपती मंदिरामध्ये दररोज भजन, कीर्तन, प्रवचन, सामूहिक श्रीसुक्त पठण, वेदपठण असे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
ग्रामदैवत तांबडी जोगेश्वरी मंदिर
मंदिरामध्ये विधिवत आणि पारंपरिक पद्धतीने सोमवारी सकाळी घटस्थापना होणार आहे. मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी दिवसभर खुले राहणार आहे. मंदिरामध्ये नवरात्रोत्सवानिमित्त खास सजावटही करण्यात आली आहे.
महालक्ष्मी मंदिर (सारसबागेसमोर)
मंदिर ट्रस्टतर्फे यंदा नवरात्रोत्सवात दहाही दिवस धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. तसेच, मंदिर परिसरात खास विद्युत रोषणाईही करण्यात आली आहे. सोमवारी (दि.२२) रोजी सकाळी नऊ वाजता गोपालराजे पटवर्धन, पद्माराजे गोपालराजे पटवर्धन यांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे. तसेच, सायंकाळी ६ वाजता मंदिरावरील विद्युतरोषणाईचे उद्घाटन पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते होणार आहे. याशिवाय दहा दिवसांत श्रीसुक्त अभिषेक, श्रीविष्णू सहस्त्रनाम पाठ, महालक्ष्मी महायाग, महाआरती असे धार्मिक कार्यक्रमदेखील मंदिरामध्ये होणार आहेत.
श्री भवानी माता मंदिर (भवानी पेठ)
पारंपरिक आणि विधिवत पद्धतीने मंदिरांच्या विश्वस्तांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे. सकाळी ६ ते ९ महारुद्राभिषेक महापूजा, ९ वाजता तुकाराम दैठणकर यांचे सनईवादन होणार आहे, तर सकाळी ११ वाजता घटस्थापना होईल, तर आर्ट ऑफ लिव्हिंगचे सत्संग हे सायंकाळी साडेपाच ते रात्री सात यावेळेत असेल, तर ह.भ.प चिन्मय देशपांडे यांचे कीर्तन होणार आहे. उत्सवात रोज भजन-कीर्तनाचे कार्यक्रम, भक्तिगीतांचे कार्यक्रम, प्रवचन असे विविध आयोजित करण्यात आले आहेत.