ग्रामसभांचे अस्तित्वच धोक्यात !
By Admin | Updated: January 25, 2017 23:51 IST2017-01-25T23:51:37+5:302017-01-25T23:51:37+5:30
गावाच्या नियोजनात्मक विकासाच्या दृष्टीने उपयुक्त व पंचायत राजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका असणाऱ्या ग्रामसभेचे महत्त्व हळूहळू लोप पावत आहे.

ग्रामसभांचे अस्तित्वच धोक्यात !
कुरकुंभ : गावाच्या नियोजनात्मक विकासाच्या दृष्टीने उपयुक्त व पंचायत राजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका असणाऱ्या ग्रामसभेचे महत्त्व हळूहळू लोप पावत आहे. त्यामुळे गावाच्या भविष्यात निर्माण होणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासाठी आवश्यक असणारे नियोजन होत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होऊनदेखील विकासकामे होत नसल्याचे वास्तव चित्र सध्या ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे.
ग्रामीण भागाचा नियोजनात्मक विकास साधण्याच्या व शासनाच्या विविध योजना लागू करण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभेचे महत्त्व अनन्यसाधारण असेच आहे. शासनाच्या निती आयोगाने प्रत्येक गावाच्या गरजेनुसार नियोजनात्मक निधी उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामसभेचा उपयोग केला जातो. यामध्ये ग्रामीण भागातील जनतेला केंद्रस्थानी ठेवून याची निर्मिती केली गेली आहे. प्रत्येक गावातील ग्रामस्थांची विविध विषयाबाबत मते, सल्ले तसेच गरजांचा प्राधान्यक्रम जाणून घेण्यासाठी तसेच गावाच्या विकासासाठी शिक्षण, रोजगार, आरोग्य, स्वच्छता व पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ग्रामसभेचा उपयोग केला जातो. यामध्ये ग्रामस्थांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या निर्णयाला शासनदरबारी महत्त्व दिले गेले आहे. त्यामुळे ग्रामसभेच्या माध्यमाचा उपयोग सुनियोजित असणे आवश्यक आहे.
ग्रामीण भागात ग्रामसभेच्या कामकाजाची माहितीच ग्रामस्थांना नसते. त्यामुळे ज्याला वाटेल त्याप्रमाणे यामध्ये प्रश्न विचारून ग्रामसभेत जाणीवपूर्वक निर्माण करण्यात येणारा गोंधळ तसेच शासकीय अधिकारीवर्गाला धारेवर धरणे, एखाद्या विषयाचे काहीच ज्ञान नसताना उगाचच त्यामध्ये खोडा घालण्याचे प्रकार सध्या जास्त प्रमाणात होताना दिसतात. त्यामुळे गावातील समस्या व नियोजनाच्या मुख्य विषयाला बगल देऊन ग्रामसभा तहकूब करण्यावर जास्त भर दिला जातो. काही वेळेस तर प्रस्थापित आपल्या राजकीय स्वाथार्साठी त्यांच्या मर्जीतील काही कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक गोंधळ करण्यासाठी जमा करीत असल्याचेदेखील आढळून येत आहे.
प्रत्येक वर्षात साधारणत: चार ग्रामसभा व अन्य गरजेनुसार विशेष ग्रामसभा घेण्यात येतात; मात्र सध्याच्या परिस्थितीत ग्रामसभांचा कोरमच पूर्ण होत नाही. त्यामुळे विकास योजना या फक्त कागदावरच राहतात.
गावाच्या विकासाच्या द्रुष्टीने उपयुक्त असणारे शासनाचे विविध योजनांच्या बाबतीत मत नोंदवण्यासाठी किंवा त्यावर चर्चासत्र राबविण्यासाठी तसेच विविध विशेष ग्रामसभांमधून एखाद्या विषयावर निर्णय घेण्यासाठी, दारूबंदीपासून अगदी ग्रामस्वच्छतासारखे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामसभांची गरज असते. मात्र, याबाबत उदासीनता असल्याचे दिसून येते. ग्रामीण भागात असे प्रकार सर्रास पाहावयास मिळतात. (वार्ताहर)