लोणावळा (पुणे) : दुचाकी गाडीवरून लिफ्ट देण्याच्या बहाण्याने एका युवतीला निर्मनुष्य ठिकाणी घेऊन जात तिचा विनयभंग केल्याप्रकरणी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात शनिवारी (२० मे) रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. त्या आरोपीला रविवारी लोणावळा शहर पोलिसांनी अटक केली.
लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक २० वर्षीय युवती शनिवारी रात्री साडेसातच्या सुमारास रायवूड विभागातील आँक्झिलियम शाळेच्या जवळून घरी जात असताना मागून दुचाकी गाडीवर आलेला तरुण वैभव साठे (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) याने मी कुरवंडे गावाकडे चाललो आहे. तुला तिकडे सोडता असे सांगत दुचाकीवर बसविले. पुढे निर्मनुष्य ठिकाणी असलेल्या भट्टी यांच्या बंगल्याच्या जवळ गाडी थांबवत तिच्या एकटेपणाचा फायदा घेत बोलण्याचा व लगट करण्याचा प्रयत्न करू लागला, तसेच हात पकडून मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले.
लोणावळा शहर पोलिस ठाण्यात या मुलीच्या फिर्यादीवरून हा विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पोलिस कर्मचारी हनुमंत शिंदे, मनोज मोरे, राजेंद्र मदने यांच्या पथकाने मुलींने वर्णन केलेले व नाव सांगितलेल्या मुलांचा शोध घेऊन अटक केली. याप्रकरणी लोणावळा शहरचे पोलिस निरीक्षक सीताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मुजावर तपास करत आहेत.