साहित्य संमेलनात ‘गझल’ दुर्लक्षितच : भीमराव पांचाळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 22:12 IST2020-01-11T22:12:45+5:302020-01-11T22:12:55+5:30
‘ गझल’ या साहित्य प्रकाराला मुख्य प्रवाहात कधीही स्थान मिळाले नाही.

साहित्य संमेलनात ‘गझल’ दुर्लक्षितच : भीमराव पांचाळे
पुणे : ‘ गझल’ या साहित्य प्रकाराला मुख्य प्रवाहात कधीही स्थान मिळाले नाही. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्येही ‘गझल’ या साहित्य प्रकाराचा प्रसार होऊ शकेल, यासाठी अनेकदा विनंती आणि अर्ज करून झाले. मात्र, पिंपरी-चिंचवड येथील साहित्य संमेलन वगळता इतर साहित्य संमेलनात ‘गझल’ हा साहित्य प्रकार सातत्याने दुर्लक्षितच राहिला असल्याची खंत ज्येष्ठ गझलगायक भीमराव पांचाळे यांनी शनिवारी व्यक्त केली.
पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित ‘सांस्कृतिक कट्टा’ या उपक्रमात पांचाळे यांचा संवादात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी त्यांनी काही गझलांचे गायन केले. संघाचे खजिनदार सुनील जगताप, उपाध्यक्ष सुकृत मोकाशी उपस्थित होते.
गझलमधील प्रत्येक शेर ही वेगळा आशय अभिव्यक्त करणारी स्वतंत्र कविता असते. त्यामुळे गझल ही कवितांची कविता आहे. काही मित्र आणि मित्रांनी धरून आणलेले चार रसिक यांच्यासमोर १९७२ मध्ये गजलगायनाची मैफल केली. तो काळ गजलसाठी प्रतिकूल होता. मात्र गझलबाबत अनेक गैरसमज पसरवले गेले. गझलेने कवितेवर आक्रमण केले असेही सांगितले गेले. पण, कुठलाही कलाप्रकार हा एकमेकांसाठी पोषकच असतो. ’भावगीत’ ही शब्दप्रधान गायकी असेल, तर गझल ही आशयप्रधान गायकी आहे. गझल गाताना आशयाला प्रधान मानले पाहिजे. रसिकांना आपली गायकी दाखविण्यासाठी नाही, तर दोन ओळीतील शेरांचा आशय पोहोचवण्यासाठी गायन करायचे, हा दंडक पाळूनच मी गझल गायन करतो, असेही त्यांनी सांगितले.
त्या-त्या टप्प्यात अनेक सामाजिक विषय ऐरणीवर आले. त्यामुळे समाजाच्या संवेदना टिपणारी गझल ही सामाजिक झाली. प्रेम आणि विरह या भावनांपलीकडे जात गझलमध्ये माणसाच्या जीवन-मरणाचे प्रश्न, समाजातील विषमता असे विषय आले. गझल हा अंतर्मुख करणारा प्रकार आहे. त्यावर कोणी नाचू शकत नाही. आता कोणीही गझललेखन करू शकतो. हे गझल या काव्य माध्यमाचे बलस्थान झाले आहे,मात्र, प्रेम हाच गझलेचा स्थायीभाव आहे, तो गझलमध्ये यायलाच हवा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
----------------------