गझल ‘पोरकी’ झाली....मान्यवरांनी दिली श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:18 IST2021-02-05T05:18:41+5:302021-02-05T05:18:41+5:30

पुणे : अंदाज आरशाचा वाटे खरा असावा, बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा, जखमा कशा सुगंधी, झाल्या काळजाला, केलेत वार ...

Ghazal became 'Porki' .... Tribute paid by dignitaries | गझल ‘पोरकी’ झाली....मान्यवरांनी दिली श्रद्धांजली

गझल ‘पोरकी’ झाली....मान्यवरांनी दिली श्रद्धांजली

पुणे :

अंदाज आरशाचा वाटे खरा असावा,

बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा,

जखमा कशा सुगंधी, झाल्या काळजाला,

केलेत वार ज्याने तो मोगरा असावा

आपल्या आयुष्यातील वेदना पचवून जखमांना सुगंधी करणारे ‘कोहिनूर ए गझल’ इलाही जमादार यांच्या निधनाने साहित्यक्षेत्रावर रविवारी शोककळा पसरली. कविवर्य सुरेश भट यांच्यानंतर गझलेला उत्तुंगतेच्या शिखरावर नेणाऱ्या या गझलकाराच्या जाण्याने गझल खऱ्या अर्थाने ‘पोरकी’ झाल्याचा एक आर्त सूर साहित्यविश्वातून उमटला. एक वाक्य उर्दू आणि एक वाक्य मराठी अशा पद्धतीने इलाही यांनी गझललेखनात नानाविध प्रयोग केले आणि त्यावर स्वत:चा एक मानदंड प्रस्थापित केला. पत्नी आणि मुलाचे निधन डोळ्यांसमोर अनुभवल्याने आयुष्यात आलेल्या रितेपणाचा एक एक हुंकार त्यांच्या लेखणीची ताकद बनला, अशा शब्दांत प्रसिद्ध गझलकारांनी त्यांच्या आठवणींचा पट उलगडला.

सांगली जिल्ह्यातील दूधगाव हे त्यांच मूळ गाव. पण गेल्या अनेक वर्षांपासून ते पुण्यातील येरवडा भागात वास्तव्यास असल्याने कित्येक गझलकारांना त्यांचा सहवास लाभला. ‘जखमा अशा सुगंधी’, भावनांची वादळे’, ‘दोहे इलाहीचे’, मुक्तक’, ‘अनुराग’, ‘अनुष्का’, अभिसारिका, गुंफण असे त्यांचे अत्यंत गाजलेले काव्य आणि गझलसंग्रह आहेत. त्यांनी केवळ प्रेमकविताच नव्हे तर सामाजिक, पर्यावरण अशा अनेक विषयांवर गझल लिहिली.

--------------------------------------

कविवर्य सुरेश भट ‘पुणे’ ही गझलेची राजधानी आहे असं म्हणायचे. याचं कारण त्यांना इलाही जमादार यांच्यासह चार सशक्त गझलकार मिळाले होते. ‘मेंदीत रंगलेली’ ही त्या वेळी त्याची गझल खूप गाजली होती. अनेक मुशायरे आम्ही एकत्रितपणे केले. निवृत्त झाल्यानंतर त्याची गझल खऱ्या अर्थाने फुलली. गझलमध्ये त्याने अनेक प्रयोग केले. त्याने ५०० शेरांचीदेखील एक गझल लिहिली. पुस्तकांबरोबरच मांजरांची देखील त्याला खूप आवड होती. गझलवर एक पुस्तक लिहिण्याचे त्याचे स्वप्न होते. पण उर्वरित आयुष्य तसं तो खूप कृतार्थपणे जगला.

- प्रदीप निफाडकर, गझलकार

....

गझलकार इलाही जमादार यांच्या वाढदिवसानिमित्त मी एक लेख लिहिला होता. तो वाचल्यानंतर मी इतकं लिहिलं आहे, पण माझ्यावर फारसं कुणी लिहिलं नाही, असं त्यांनी म्हटल्याने वाईट वाटलं. नुसता एक लेख लिहिल्यानंतर त्यांच्या डोळ्यांत पाणी तरळलं, मग त्यांच्यावर एक संपादित पुस्तक केलं. त्यानंतर ‘जखमांचे सुगंधीपण जपणारा इलाही’ आणि ‘कोहिनूर-ए-गझल इलाही’ हे चरित्रात्मक अशी दोन पुस्तके लिहिली. त्यांच्याशी अत्यंत घरोब्याचे संबंध निर्माण झाले होते. स्वत:ची आर्थिक परिस्थिती बिकट असूनही त्यांनी माझ्या मुलाला दहा हजार रुपये पाठविले. आजही ते बँकेमध्ये डिपॉझिट स्वरूपात ठेवले आहेत. त्यांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत प्रेमळ आणि संवेदनशील होते. त्यांच्या आठवणींवर एक पुस्तक होऊ शकेल.

- प्रा. राम वाघमारे, प्रसिद्ध लेखक

---------------------------------------------

इलाही आणि माझा खूप जवळचा संबंध होता. गझल हा त्यांचा श्वास होता. त्यांचे उर्दूवर प्रभुत्व होते. त्यामुळे तोच भाव त्यांच्या गझलमध्ये पाहायला मिळायचा. ‘पुस्तकातून पाहिलेली, वाचलेली माणसं गेली कुठे? अशा त्यांच्या अनेक गझलांवर आम्ही मनस्वी प्रेम केले. भीमराव पांचाळ यांनी त्यांच्या गझल घराघरांत पोहोचविल्या. ‘जखमांचे सुगंधीपण जपणारा इलाही’ आणि ‘गझलकार इलाही’ अशी त्यांची दोन पुस्तके आम्ही प्रकाशित केली.

- बबन जोगदंड, स्वयंसिद्ध प्रकाशन

-------------

आम्ही समकालीन गझलकार आहोत. तब्बल ४० वर्षे आम्ही एकत्रितपणे मंचावर कार्यक्रम सादर करीत असू. भीमराव पांचाळ यांच्या मदतीने आम्ही कार्यशाळा घेतल्या. तो काळ असा होता की त्या वेळी कुणीच कुणाचे स्पर्धक नव्हतो. एकमेकांना कायम प्रोत्साहन द्यायचो. ‘मात्रावृत्त’ हे त्यांच्या गझलेचे वैशिष्ट्य होते. वेगवेगळे काफिये घेऊन त्यांनी गझल रचली. आजकाल जुन्या गझला वाचायच्या आणि त्यातील विचार आपल्या शव्दांत मांडायचे अशा गोष्टी घडत आहेत. मात्र त्या वेळी सृजनशीलता हा प्रत्येकाचा स्थायिभाव होता. आज एक चांगला मित्र आणि गझलकार गमावला.

- संगीता जोशी, गझलकार

----------------------------------------------

Web Title: Ghazal became 'Porki' .... Tribute paid by dignitaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.