भिगवण: राज्यात आणि जिल्ह्यात कोरोनाचा आलेख खाली आला असला, तरी तिसरी लाट येण्याची शक्यता आरोग्य तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे प्रशासन निर्बंधातील शिथिलता करत नाही. असे असताना भिगवण येथील कोविड सेंटर बंद करण्याचा घाट घातला जात असल्यामुळे रुग्णांना इंदापूर आणि बारामती येथे उपचारासाठी जाण्याची वेळ येणार आहे.
कोरोना रुग्णांचा आकडा कमी होत असला, तरी तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे आस्थापना आणि धार्मिक कार्यक्रामावर निर्बंध कमी करण्यात आलेले नाहीत.व्यापारी वर्गासाठी सोमवार ते शुक्रवार ४ वाजण्याचा वेळ देण्यात आला आहे. तर शनिवारी आणि रविवारी पूर्णपणे वीकेंड लॉकडाऊन पाळला जात आहे. असे असताना प्रशासन मात्र भिगवण येथील कोविड सेंटर बंद करण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.यातील पहिल्या टप्प्यात आरोग्यसेविका यांना कमी करण्यात आले.तर गेली १५ दिवस विना आरोग्य सेविकांच्या उपस्थितीत उपचार करताना डॉक्टरांना जादाचे काम करावे लागत आहे. २ आरोग्य सेविका आणि ३ डॉक्टर यांच्या माध्यमातून कोरोना रुग्णांना सेवा सुरू असताना आता नवीन रुग्णांना इंदापूर आणि बारामती येथे भारती होण्याचा सल्ला दिला जात आहे.त्यामुळे भिगवण येथील कोविड सेंटर बंद झाले, तर रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे राज्यमंत्री भरणे यांनी या आरोग्य सेवेकडे लक्ष देऊन भिगवण येथील कोविड सेंटर चालूच ठेवण्याची मागणी नागरिकांतून येत आहे.
याबाबत तहसीलदार अनिल ठोंबरे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.