पुणे :बालगंधर्व रंगमंदिरामध्ये रविवारी (दि.१५) सायंकाळी ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाचा प्रयोग सुरू असताना तांत्रिक बिघाड झाला आणि दहा मिनिटे प्रयोग थांबविण्यात आला. त्यामुळे रसिकप्रेक्षकांमध्ये चांगलाच गोंधळ उडाला. दहा मिनिटांनंतर पुन्हा प्रयोग सुरू करण्यात आला.गेल्या काही वर्षांपासून बालगंधर्व रंगमंदिरातील विविध समस्यांवर आवाज उठविण्यात येत होता. त्यानंतर गेल्या वर्षी रंगमंदिराची डागडुजी करण्यात आली. पण आजही अनेक समस्या समोर येत आहेत. रविवारी घाशीराम कोतवाल या नाटकाचा प्रयोग सुरू असताना अचानक आवाजच येत नव्हता. त्यामुळे कलाकार काय बोलत आहेत, ते नाट्यरसिकांना ऐकू येत नव्हते. त्यामुळे बराच गोंधळ उडाला. आवाजाच्या यंत्रणेत बिघाड झाल्याने दहा मिनिटे प्रयोग थांबविण्यात आला. आवाजाची यंत्रणा सुरू केल्यावर प्रयोग पुन्हा सुरू झाला.
‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाच्या दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने आवाज काहीकाळ बंद होता. परंतु, दहा मिनिटांनंतर सर्व यंत्रणा नीट झाली आणि प्रयोग सुरू करण्यात आला. -राजेंद्र कामठे, व्यवस्थापक, बालगंधर्व रंगमंदिर